spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

बहुजन विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध – मंत्री अतुल सावे

– ‘वनार्टी’च्या अधिकृत संकेतस्थळ व माहिती पत्रकाचे थाटात प्रकाशन

नागपूर :- बहुजन समाजातील वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षण, कौशल्य आणि स्वावलंबनाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संधींचे नवे दालन उघडले जात आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात डिजिटल साधनांचा योग्य वापर करणारा, ज्ञान आत्मसात करणारा आणि आत्मविश्वासाने पुढे जाणारा विद्यार्थीच यशस्वी ठरतो. शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटल माध्यमे अत्यंत प्रभावी ठरत आहेत, असे प्रतिपादन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा ‘वनार्टी’चे अध्यक्ष अतुल सावे यांनी केले.

नांदेड येथील शंकरराव चव्हाण सभागृहात इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे आयोजित ‘कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळावा’ या कार्यक्रमात वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी), नागपूर यांच्या अधिकृत संकेतस्थळ डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.वनार्टी. इन (www.vanarti.in) व माहिती पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतुल सावे होते. या प्रसंगी माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोक चव्हाण, खा. डॉ. अजित गोपछडे, आ. राजेश पवार, आ. बाबुराव कोहळीकर, महापौर कविता मुळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या संचालक सोनाली मुळे, ‘वनार्टी’चे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे, इतर मागासवर्ग वित्त व विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. वसंत माने, ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे तसेच वसंतराव नाईक विकास महामंडळाचे संचालक प्रताप पवार आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना अतुल सावे म्हणाले की, वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था ही विमुक्त जाती (व्हिजे-ए) तसेच भटक्या जमाती ब, क व ड (एनटी-बी, एनटी-सी व एनटी-डी) नॉन-क्रिमीलेअर प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी संधी निर्माण करणारे प्रभावी व्यासपीठ ठरत आहे. स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, अर्थसहाय्य, कौशल्य विकास, अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश मार्गदर्शन तसेच उद्योजकता विकास अशा विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत असल्याचे अतुल सावे यांनी सांगितले.

एका क्लिकवर योजना, मार्गदर्शन आणि करिअरच्या संधी – प्रशांत वावगे

‘वनार्टी’च्या नव्या संकेतस्थळ व माहिती पत्रकामुळे विद्यार्थ्यांना विविध शासकीय योजना, अर्ज प्रक्रिया, प्रशिक्षण व करिअर मार्गदर्शनाची सविस्तर माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे, असे ‘वनार्टी’चे व्यवस्थापकीय संचालक मा. प्रशांत वावगे यांनी सांगितले. राज्यातील हजारो विद्यार्थी यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग आदी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवत असून, या डिजिटल माध्यमामुळे त्यांच्या तयारीला अधिक गती मिळणार आहे. संकेतस्थळावरील क्यूआर कोड स्कॅन करून विद्यार्थी प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधींपर्यंत सहज पोहोचू शकतात. ‘वनार्टी’ ही संस्था विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारा दीपस्तंभ ठरत असून, या नव्या डिजिटल व्यासपीठामुळे त्यांच्या स्वप्नांना ठोस दिशा मिळणार असल्याचा विश्वासही प्रशांत वावगे यांनी व्यक्त केला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.