spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आदिवासी समाज व विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करण्याचा संकल्प करा – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके

यवतमाळ :- आदिवासी समाज आणि विद्यार्थ्यांचे हित जोपासून चांगल्या मानसिकतेने काम करण्याचा संकल्प करा, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री ना. डॉ. अशोक उईके यांनी केले.

अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग अमरावतीच्या वतीने हॅाटेल एम डब्ल्यू पॅलेस येथे आयोजित शासकीय आदिवासी आश्रमशाळा विद्यार्थी प्रवेश क्षमता वाढीसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन व समारोप मंत्री ना. डॉ. अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा ॲड. प्रियदर्शनी उईके, अमरावती विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह, नाशिक विभागाचे अपर आयुक्त डिगांबर चव्हाण, मुख्य अभियंता ढाबे, सर्व प्रकल्प अधिकारी, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

पुढे बोलतांना मंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले की, ग्रामीण भागातील आश्रमशाळांमध्ये विद्यार्थी प्रवेश संख्या वाढविण्यासाठी ग्रामसभांचे आयोजन करावे. त्यामाध्यमातून आदिवासी आश्रमशाळाविषयी पालकांचा विश्वास संपादन करुन त्यांचे मन परिवर्तन करावे. यासह शासकीय योजनांची जनजागृती करुन लोकसहभाग वाढवावा आणि लोकचळवळ निर्माण करावी. तसेच आदिवासी विद्यार्थी हा केंद्रबिंदू माणून काम करावे. आदिवासी समाजात परिवर्तन घडविण्यासाठी प्रशासन व आश्रमशाळांनी चांगल्या मानसिकतेचे काम केले पाहिजे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

आश्रमशाळेत समित्या गठीत करा

शासकीय आश्रमशाळेच्या प्रभावी कामकाजासाठी मुख्याध्यापक स्तरावर समित्या गठीत कराव्यात. त्यामध्ये शाळा प्रवेश समिती, भोजन समिती, दिनचर्या समिती, देखरेख समिती इत्यादींचा समावेश असावा, अशा सूचना मंत्री डॉ. अशोक उईके यांनी यावेळी दिल्या.

योजना, यथकथांची प्रचार प्रसिद्धी करा

आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या योजना, उपक्रम व उल्लेखनीय कार्याबाबत प्रत्येक कार्यालयांनी प्रचार प्रसिद्धीवर भर द्यावा. या माध्यमातून आदिवासी विकास योजना, आश्रमशाळा व वसतिगृहांबाबत समाजात सकारात्मकता निर्माण करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

वसतीगृहांना नियमित भेट द्या

आदिवासी समाजातील मुलामुलींसाठीच्या वसतिगृहांना प्रकल्प अधिकाऱ्यांनी नियमित भेटी देवून आढावा घ्यावा. वसतिगृहाबाबत गैरसमज दूर करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.

गृहपालांना वसतिगृहातच राहणे बंधनकारक

आदिवासी वसतीगृहात अनुचित प्रकार घडून नये या उद्देशाने नियंत्रणासाठी गृहपालांना वसतिगृहातच राहणे बंधनकारक करुन वसतीगृहांची तपासणी करावी. गैरहजर असलेल्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही मंत्री डॉ. अशोक उईके यांनी यावेळी दिले.

आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी आश्रमशाळांमध्ये दिनचर्या, पौष्टिक आहार, आरोग्य तपासणी करावी. तसेच ‘आधी प्रवेश नंतर कागदपत्र’ या संकल्पनेनुसार विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश द्यावा. यासह पट नोंदणी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे सांगून शिक्षकांच्या क्षमता बांधणीसाठी त्यांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करणार असल्याचे सांगितले. तसेच आश्रमशाळेत विद्यार्थी प्रवेश वाढविण्यासाठी सुरु असलेल्या डिजिटल उपक्रमांची माहिती दिली.

या कार्यशाळे दरम्यान विभागातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या नियोजनाची माहिती प्रकल्प संचालकांनी सादर केली. यामध्ये पांढरकवडा, पुसद, धारणी, किनवट, छ. संभाजीनगर, अकोला आणि कळमनुरी यांचा समावेश होता.

पुसद प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर यांचा सत्कार

शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी पटसंख्या वाढवण्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर, मुख्याध्यापक रविंद्र घड्याळे, गजानन खडीकर यांचा आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.