spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सिलिंडर डिलिव्हरीसाठी जास्तीचे पैसे देताय?

– वरच्या मजल्याचे कारण सांगून होणारी वसुली अवैध

नागपूर :- घरगुती गॅस सिलिंडर घरापर्यंत आणून देणाऱ्या डिलिव्हरी कर्मचाऱ्यांकडून अतिरिक्त पैशांसाठी अगदी तगादा लावला जातो. पण, हा प्रकार पूर्णतः नियमबाह्य असून या प्रकाराची तक्रार करण्यासाठी टोल-फ्री हेल्पलाइनही आहे.

घरगुती गॅस सिलिंडरची डिलिव्हरी करताना मजला जास्त असल्याचे किंवा जिने चढून यावे लागत असल्याचे कारण पुढे करत काही डिलिव्हरी कर्मचारी २० ते ५० रुपयांपर्यंत अतिरिक्त मागणी करतात. सिलिंडरच्या किमतीतच घरापर्यंतच्या वाहतुकीचा आणि डिलिव्हरीचा खर्च आधीच समाविष्ट असतो, त्यामुळे वेगळे परिवहन शुल्क आकारण्यास मनाई आहे. पेट्रोलियम कंपन्यांच्या नियमांनुसार ग्राहक कोणत्याही मजल्यावर राहत असला तरी सिलिंडर त्याच्या घरातील किचनपर्यंत पोहोचवणे ही डिलिव्हरी कर्मचाऱ्याची कायदेशीर जबाबदारी आहे. अनेकदा ग्राहक विशेषतः गृहिणी वाद टाळण्यासाठी किंवा माहितीअभावी ही अतिरिक्त रक्कम देतात. मात्र, टीप देणे ही पूर्णपणे ऐच्छिक बाब असून ती जबरदस्तीने मागणे किंवा त्यासाठी ग्राहकावर दबाव आणणे नियमांच्या विरोधात आहे.

ग्राहकांनी केवळ गॅसच्या पावतीवर नमूद केलेली अधिकृत रक्कमच द्यावी आणि कर्मचारी अधिक पैशांची मागणी करीत असेल तर तत्काळ संबंधित गॅस एजन्सीकडे जाब विचारला पाहिजे. अशा तक्रारीसाठी ग्राहक १८००-२३३-३५५५ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात. याशिवाय पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिकृत संकेतस्थळांवर मोबाइल ॲपद्वारे किंवा एजन्सीमधील तक्रार पुस्तिकेत नोंद करूनही ग्राहक आपले प्रश्न मांडू शकतात.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.