spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

टाटा मेमोरियल रुग्णालयात अत्याधुनिक निदान सुविधांना बळकटी देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

▪ सीएसआर प्रकल्पांतर्गत अत्याधुनिक स्वयंचलित ट्यूब लेबलिंग व बारकोडिंग (एपीटीएल) प्रणालींची स्थापना

मुंबई :- देशातील अग्रगण्य कर्करोग उपचार व संशोधन केंद्र असलेल्या टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे निदान व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर) अंतर्गत महत्त्वपूर्ण प्रकल्प राबविण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत अत्याधुनिक स्वयंचलित ट्यूब लेबलिंग व बारकोडिंग प्रणाली (एपीटीएल) या तीन प्रगत यंत्रणांची यशस्वी स्थापना करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या नव्या प्रणालींमुळे नमुन्यांचे अचूक लेबलिंग आणि बारकोडिंग स्वयंचलित पद्धतीने होणार असून, मानवी त्रुटी कमी करण्यास मोठी मदत होणार आहे. परिणामी, निदान प्रक्रियेत अचूकता वाढणार असून रुग्णांच्या सुरक्षिततेत लक्षणीय सुधारणा होईल. तसेच, रुग्णालयातील क्लिनिकल वर्कफ्लो अधिक सुलभ आणि कार्यक्षम होणार आहे.

विशेषतः कर्करोगासारख्या गंभीर आजारांमध्ये निदानातील अचूकता आणि वेळेवर उपचार अत्यंत महत्त्वाचे असतात. एपीटीएल प्रणालीमुळे नमुने हाताळण्यातील गोंधळ, विलंब आणि चुकीची ओळख यांसारख्या समस्या मोठ्या प्रमाणात कमी होतील. त्यामुळे डॉक्टरांना अधिक विश्वासार्ह अहवाल मिळून उपचार प्रक्रियेत गती येईल.

जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवांकडे आणखी एक पाऊल

या उपक्रमामुळे रुग्णालयातील प्रयोगशाळा व्यवस्थापन आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत होऊन, जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवांकडे आणखी एक पाऊल टाकले गेले आहे. सीएसआर च्या माध्यमातून अशा प्रकारच्या अत्याधुनिक सुविधांची उभारणी केल्याने सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यास मोठी मदत होत आहे. या उपक्रमासाठी इंडियन ऑइल कंपनीने सहकार्य केले आहे त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार व्यक्त केले.

निदान प्रक्रियेत अचूकता, पारदर्शकता

याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की “टाटा मेमोरियल रुग्णालयात उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक एपीटीएल प्रणालीमुळे निदान प्रक्रियेत अचूकता, पारदर्शकता आणि गती वाढणार आहे. रुग्णांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची ही दिशा महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. सीएसआर च्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात होणारी ही गुंतवणूक भविष्यात अधिक सक्षम आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्यासाठी मोलाची ठरेल.”


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.