– फर्जी बुकिंगचा पर्दाफाश; दोषी एजन्सींचे परवाने रद्द करण्याची मागणी, अन्यथा ‘मनसे स्टाईल’ आंदोलनाचा इशारा
हंसराज भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील गॅस वितरण प्रणालीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरू असून, गॅस एजन्सींकडून ग्राहकांची उघडपणे फसवणूक केली जात असल्याचा खळबळजनक आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) केला आहे. या संदर्भात मनसेच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
डिजिटल प्रणालीचा गैरवापर आणि ‘ओटीपी’ घोटाळा जिल्ह्यातील अनेक गॅस एजन्सी ग्राहकांच्या नावावर बनावट पद्धतीने सिलिंडरची बुकिंग करत आहेत.
ग्राहकांच्या मोबाईलवर सिलिंडर बुक झाल्याचा ‘ओटीपी’ (OTP) येतो, मात्र प्रत्यक्षात त्यांना सिलिंडर मिळत नाही. जेव्हा संतप्त ग्राहक एजन्सीमध्ये चौकशीसाठी जातात, तेव्हा “तुम्ही सिलिंडर नेला आहे,” असे सांगून त्यांची बोळवण केली जाते. अनेक ठिकाणी तर ग्राहकांना पुन्हा पैसे भरून नवीन बुकिंग करण्यास भाग पाडले जात आहे. हा प्रकार विशेषतः ग्रामीण भागात
मोठ्या प्रमाणावर सुरू असून, डिजिटल प्रणालीचा गैरवापर करून हा मोठा घोटाळा केला जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
काळाबाजारी रोखण्यासाठी ‘भरारी पथके’ नेमा भविष्यात उद्भवू शकणाऱ्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅसची काळाबाजारी होण्याची शक्यता मनसेने वर्तवली आहे. प्रशासनाने आतापासूनच ठोस कार्ययोजना तयार करावी आणि काळाबाजारी रोखण्यासाठी तात्काळ ‘भरारी पथके’ (Flying Squads) तैनात करावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. बनावट बुकिंग करणाऱ्या एजन्सींचे परवाने रद्द न झाल्यास मनसे आपल्या खास शैलीत (मनसे स्टाईल) तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही प्रशासनाला देण्यात आला आहे.
यांची होती उपस्थिती जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देताना मनसे जिल्हाध्यक्ष नितीन वानखेडे, उपाध्यक्ष शैलेश गजभिये, शहराध्यक्ष नितीन खेडीकर, उपाध्यक्ष शरद साकुरे, लकी पाल, अभिषेक मादामे, हरीश मारबते यांच्यासह मनसेचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.