हंसराज भंडारा/कोरंभी :- येथील माजी ग्रामपंचायत सदस्य रुपेश चुंभरे यांच्या शेतातील फार्महाऊसला १७ मे रोजी सायंकाळच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आणीबाणीच्या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि तातडीने केलेल्या मदतीमुळे मोठी हानी टळली असून आग आटोक्यात आली आहे.
, रविवार, १७ मे रोजी सायंकाळी ५:४५ च्या सुमारास रुपेश चुंभरे यांच्या फार्महाऊसला अचानक आग लागली. आगीचे स्वरूप इतके भीषण होते की, घरातील सर्व साहित्य वेगाने जळू लागले होते. यावेळी त्यांनी तातडीने जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांच्याशी संपर्क साधला.
योगायोगाने, ज्या वेळी हा फोन आला, त्या वेळी यशवंत सोनकुसरे हे चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाहच्या घनदाट जंगलात होते. तिथे मोबाईल नेटवर्कची मोठी समस्या होती. नेटवर्कची जेमतेम एकच ‘काठी’ दिसत असताना आणि संपर्क तुटत असतानाही, सोनकुसरे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आपली गाडी थांबवली. मोठ्या मुश्किलीने आपल्या संपर्कातील लोकांशी संवाद साधून त्यांनी तातडीने अग्निशमन दलाची (फायर ब्रिगेड) व्यवस्था केली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. शर्थीचे प्रयत्न करून त्यांनी ही आग आटोक्यात आणली. यशवंत सोनकुसरे स्वतः उपस्थित नसतानाही त्यांनी दुर्गम भागातून केलेल्या नियोजनामुळे फार्महाऊसचे पुढील नुकसान टळले.
“आम्ही कुठेही असो किंवा वेळ कोणतीही असो, आपल्या क्षेत्रातील लोकांवर जेव्हा संकट येते, तेव्हा त्यांच्या मदतीला धावून जाणे हे आमचे कर्तव्य आहे,” अशी भावना यशवंत सोनकुसरे यांनी या प्रसंगी व्यक्त केली. त्यांच्या या तत्परतेचे परिसरात कौतुक होत आहे.