spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मनपा कर्मचारी सहकारी बँकेतर्फे खातेधारकांना 1 कोटींचे विमा संरक्षण

– मनपा सहकारी बँकेतर्फे 4 कोटी 25 लाख रुपयांच्या अपघात विम्याचे वाटप

नागपूर :- नागपूर महानगरपालिका कर्मचारी सहकारी बँकेतर्फे अपघात विमा योजना लागू असून, या योजनेअंतर्गत गेल्या दोन वर्षात नैसर्गिक किंवा अपघाती निधन झालेल्या कर्मचार्यांच्या वारसांना 4 कोटी 25 लाख रुपयांचा अपघाती विम्याचे वाटप करण्यात आले आहे. खातेधारकांच्या विमा संरक्षणाच्या रक्कम 1 कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव बँकेच्या विचाराधीन आहे.

नागपूर महानगरपालिका कर्मचारी सहकारी बँकेतर्फे महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचारी असलेल्या खातेधारकांना नैसर्गिक मृत्यू आल्यास 10 लाख रुपये व अपघाती मृत्यू आल्यास 25 लाख रुपयांचे विमा कवच दिले आहे. कर्मचारी सहकारी बँकेच्या चारही शाखांमधील खातेधारकांना ही योजना लागू आहे.

नागपूर महानगरपालिका कर्मचारी सहकारी बँकेतर्फे खातेधारकांचे हित जपण्यासाठी सुरू असलेल्या योजनांची माहिती बँकेच्या संचालक मंडळाने माननीय महापौर निता ठाकरे, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे व सत्ता पक्षनेता नरेंद्र (बाल्या) बोरकर, आयुक्त डॉ. विपीन यांना एका निवेदनाद्वारे दिली. तसेच बँकेद्वारे भविष्यात राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती सुद्धा दिली.

सन 2024-2025 या आर्थिक वर्षात या योजनेअंतर्गत 29 जणांच्या वारसांना 1 कोटी 95 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षात 23 खातेधारकांना मदत देण्यात आली आहे. ही रक्कम 2 कोटी 30 लाख एवढी आहे. दोन्ही वर्षांची एकंदरीत रक्कम 4 कोटी 25 लाख रुपयांची रक्कम मृत कर्मचार्यांच्या वारसांना देण्यात आली आहे. खातेधारकांना असलेल्या विमा संरक्षणाची रक्कम वाढविण्याचा प्रस्ताव बँकेच्या विचाराधीन आहे. यात अपघाती विमा संरक्षण 50 लक्ष ते 1 कोटी रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. त्याचप्रमाणे नवीन स्वास्थ्य विमा योजने अंतर्गत कर्करोग, लकवा, हृदयरोग व अवयव प्रत्यारोपणासाठी तसेच अशा प्रकारच्या गंभीर आजारांकारिता आर्थिक सहाय्य दिले जाणार असल्याचे नागपूर महानगरपालिका कर्मचारी सहकारी बँकेच्या अध्यक्षांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

कर्मचारी बँकेतर्फे खातेधारकांना इतरही सुविधा उपलब्ध करून दिल्या असून 10 लाख रुपयांपर्यंत विनातारण कर्ज तर तारणावर 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. याशिवाय मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या अंत्यविधीसाठी तात्काळ मदत, असाध्य आजार उपचारासाठी मदत व सेवानिवृत्त कर्मचार्यांना बँकेकडून मदत दिली जात असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

करिता जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी आपले खाते मनपा बँकेत काढण्याचे आवाहन बँकचे अध्यक्ष गोविंद दावळे व संचालक मंडळानी केले आहे.

Popular Articles