हंसराज, भंडारा लाखनी :– स्थानिक स्व. निर्धन पाटील वाघाये महाविद्यालय, लाखनी येथे भूगोल व वनस्पतीशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. “पर्यावरणाचे संरक्षण केले तरच जैवविविधता टिकून राहील,” असे प्रतिपादन डॉ. कापसे यांनी या प्रसंगी केले.
कार्यक्रमाचे औचित्य साधून डॉ. कापसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, जागतिक पर्यावरण दिन हा केवळ एक दिवस नसून पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागरूकता आणि कृतीला प्रोत्साहन देणारे एक जागतिक व्यासपीठ आहे. दरवर्षी ५ जून रोजी जगभर हा दिवस साजरा केला जातो. सागरी प्रदूषण, वाढती लोकसंख्या, ग्लोबल वॉर्मिंग, शाश्वत उपभोग आणि वन्यजीव गुन्हेगारी यांसारख्या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी समाजात जागृती निर्माण करणे ही काळाची गरज आहे.
यावेळी प्रा. श्रद्धा बोरकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी या दिवशी विविध स्तरावर कार्यक्रम आयोजित केले जातात. मानवी कृतींचा पर्यावरणावर होणारा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम समजून घेण्याचा हा दिवस आहे. हा दिवस आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या आपल्या जबाबदारीची जाणीव करून देतो.
कार्यक्रमाचे यशस्वी संचालन डॉ. मंगेश वंजारी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रा. तुषार डोंगरवार यांनी मानले. या कार्यक्रमाला डॉ. पुण्यशील टेंभुर्णे, डॉ. शेंडे, डॉ. शहारे, डॉ. देवघरे, प्रा. भोयर यांच्यासह महाविद्यालयातील इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. पर्यावरण दिनानिमित्त राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.








