– जलपर्णीचे निर्मूलनासाठी 7 पोकलेन, 10 जेसीबीसह वीड हार्वेस्टर मशीन कार्यरत
नागपूर :- पर्यावरणासाठी घातक असलेल्या ऐतिहासिक अंबाझरी तलावातील जलपर्णीचे निर्मूलन करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने सुरू केलेल्या मोहिमेला आता यश येणार असून येत्या एक महिन्यात अंबाझरी तलावातील बहुतांश जलपर्णीचे निर्मूलनासाठी 7 पोकलेन, 10 जेसीबी, 20 टिप्परसह वीड हार्वेस्टर मशीनची मदत घेतली जात आहे.
शहराचे वैभव असलेल्या अंबाझरी तलावाला गेल्या काही वर्षांपासून जलपर्णी या घातक वनस्पतीचा विळखा बसला आहे. ही जलपर्णी काढण्यासाठी महापौर निता ठाकरे, उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, परिवहन समिती सभापती मंगला खेकरे, आरोग्य समिती सभापती मनीष अतकरे, क्रीडा समिती सभापती दर्शनी धवड, धरमपेठ झोन समिती सभापती धनश्री देशपांडे, नेहरुनगर झोन समिती सभापती सीमा ढोमणे, व आयुक्त डॉ. विपीन, अतिरिक्त आयुक्त अंकित यांनी काही महिन्यापासून गांभीर्याने प्रयत्न सुरू केले आहे. या प्रयत्नांना आता यश येत असल्याचे दिसून येत आहे. मनपाच्या युद्धपातळीवरील प्रयत्नाने अंबाझारी तलाव आता मोकळा श्वास घेणार आहे.
नव्या यंत्र सामुग्रीचा वापर
काही दिवसापर्यंत संपूर्ण अंबाझरी तलावाच्या पाण्यावर जलपर्णीचे आच्छादन झाले होते. आता मात्र जवळपास 40 टक्के भाग स्वच्छ झाला आहे. यासाठी प्रशासनाने 7 पोकलेन, 20 टिप्पर व 10 जेसीबी मशीन तैनात करण्यात आल्या आहे. याशिवाय जलपर्णी काढण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरलेले वीड हार्वेस्टरची खरेदी मनपाने केली आहे. या अत्याधुनिक मशीनने जलपर्णी काढण्याच्या कामाला गती मिळाली आहे.
पर्यावरण संवर्धन पंधरवड्यानिमित्त महापौर निता ठाकरे, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे, आयुक्त डॉ. विपीन यांनी सर्वांसह जलपर्णी काढल्या जात असलेल्या भागाला भेट देऊन पाहणी केली. सध्या ही मोहिम एफडीसीएमच्या कार्यालयाला लागून असलेल्या अंबाझरी तलावातून जलपर्णी काढण्याचे काम सुरू आहे.
मोहिमेला गती द्या – महापौर ठाकरे
जलपर्णी काढण्याच्या काम सुरू आहे. परंतु पावसाळा तोंडावर असल्याने या कामाला गती द्यावी, असे निर्देश महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले. या तलावाला एक ऐतिहासिक महत्त्व असल्याने अंबाझरी तलावाचे चित्र बदलण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
नव्या तंत्राचा वापर करा – आयुक्त डॉ. विपीन
मनपाने जलपर्णी काढण्यासाठी पोकलेन, जेसीबीसह वीड हार्वेस्टरचा वापर सुरू केला आहे. परंतु याशिवाय कोणत्याही इतर प्रणालीचा वापर करून जलपर्णी काढता येत असल्यास त्याचा उपयोग करावा, असे निर्देश आयुक्त डॉ. विपीन यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिले.



