– रोजगार सेवकांच्या आयडी-पासवर्ड गैरवापर प्रकरणाची होणार चौकशी !
– युजर ID गैरवापर निष्पन्न झाल्यास फौजदारी कारवाई करण्याचे प्रशासनाचे निर्देश !
मोर्शी तालुका प्रतिनिधी :- मोर्शी विधानसभा मतदार संघातील पांदण रस्त्यांच्या कामांमध्ये बोगस मस्टर, अपूर्ण कामे आणि निधीच्या गैरवापराबाबत गंभीर आरोप होत असताना या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याच्या मागणीला विरोध होत असल्याने पांदण रस्त्यांच्या कामाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
मोर्शी वरूड तालुक्यातील विविध गावांमध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत मातोश्री पाणंद रस्ते योजनेतून करण्यात आलेल्या कामांमध्ये हजारो मजुरांच्या नावावर बोगस हजेरीपत्रके (मस्टर) भरल्याचा आरोप करण्यात येत आहे. या आरोपांची सखोल चौकशी व्हावी, दोषींवर कारवाई व्हावी अशी शेतकरी व नागरिकांची मागणी होत असतांनाच मोर्शी विधानसभा मतदार संघातील ग्रामरोजगार सहाय्यकांच्या युजर ID आणि पासवर्ड चा कथित गैरवापर होत असल्याच्या तक्रारीची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत.
रोजगार सहाय्यक संघटना वरूड यांनी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने उपजिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांना पत्र पाठवून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
प्राप्त तक्रारीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून काही अज्ञात व्यक्तींकडून ग्रामरोजगार सहाय्यकांच्या User ID व Password चा वापर करून मजुरांच्या उपस्थिती नोंदी करण्यात येत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेतील कामांच्या नोंदींबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
प्रशासनाने सर्व ग्रामरोजगार सहाय्यकांना तत्काळ पासवर्ड बदलण्याबाबत सूचना देण्यास सांगितले असून या गंभीर प्रकरणाची उप जिल्हाधिकारी रोहयो यांनी सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध आवश्यक कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच चौकशीदरम्यान युजर ID चा गैरवापर झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचाही इशारा प्रशासनाने दिला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे मोर्शी विधानसभा मतदार संघातील रोजगार हमी योजनेच्या कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून चौकशी अहवालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.







