spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागपुरात ‘शासन कारभार’ बीअर बारमध्ये: सुट्टीच्या दिवशी दारू पीत फाईल्सवर सह्या!

नागपूर २८ : प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. रविवारच्या सुट्टीच्या दिवशी, मनिष नगर येथील एका बीअर बारमध्ये काही व्यक्ती दारूचे घोट घेत शासकीय फाईल्स तपासताना आणि त्यावर सह्या करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे प्रशासकीय कामकाजाची गंभीरता आणि गोपनीयतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तीन व्यक्ती एका बीअर बारमध्ये बसलेल्या दिसत आहेत आणि त्यापैकी एक जण दारू पीत शासकीय फायलींची पडताळणी करत आहे. महाराष्ट्र शासनाच्या फाईल्सचा गठ्ठा त्यांच्यासोबत होता. हे अधिकारी नेमके कोणत्या विभागाचे होते, त्यांनी कोणत्या महत्त्वाच्या फाईल्सवर बारमध्ये येऊन सह्या केल्या, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, समाजमाध्यमांवर या घटनेवरून प्रशासनावर जोरदार टीका केली जात आहे.

बारमध्ये शासकीय फायलींची पडताळणी?

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील मनिषनगर भागातील एका प्रसिद्ध बीअर बारमध्ये दुपारी ३.३० च्या सुमारास हा प्रकार घडला. तीन व्यक्ती बारमध्ये आल्या आणि त्यांनी दारूची ऑर्डर दिल्यानंतर टेबलावर शासकीय फायलींचा गठ्ठा उघडून त्यांची पडताळणी सुरू केली. या बारमध्ये जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.

पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेऊन रविवार दुपारचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास हे अधिकारी कोण होते आणि त्यांनी कोणत्या महत्त्वाच्या फायलींवर सह्या केल्या, हे स्पष्ट होऊ शकते. मात्र, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासन किंवा पोलीस या प्रकरणात कितपत लक्ष घालतात आणि दोषींवर कारवाई करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Popular Articles