– भाजपा प्रदेश प्रवक्ते नवनाथ बन यांची घणाघाती टीका
मुंबई :- देशाचे तुकडे करण्याचे स्वप्न पहात तुकडे गँगचे समर्थन करणाऱ्या इंडिया आघाडीचेच अखेर तुकडे होताना पहायला मिळत आहे. दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीत आम आदमी पार्टी, डीएमके सहभागी झाले नाहीत. उद्धव ठाकरे प्रत्यक्षपणे सहभागी झाले नाहीत. दिल्लीत सर्व विरोधकांची एकजूट करण्यात राहुल गांधी पूर्णपणे अयशस्वी झाल्याने इंडिया आघाडी ही सपशेल अपयशी झाल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असल्याची घणाघाती टीका भाजपा प्रदेश प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोमवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला भाजपाचे ज्येष्ठ प्रवक्ते रामभाऊ कुलकर्णी हेही उपस्थित होते.
देशातील 140 कोटी जनतेच्या आशीर्वादाने सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडे स्पष्ट बहुमत असल्याने संजय राऊत आणि राहुल गांधी यांनी हे सरकार बाजूला करण्याची कितीही स्वप्ने पाहिली तरी ती कधीही पूर्ण होणार नाहीत. मुळात संजय राऊत आणि उद्धव ठाकरे या बैठकीला का गेले नाहीत? संजय राऊत यांची या बैठकीला जाण्याची इच्छा होती. परंतु उद्धव ठाकरे यांनी जाणीवपूर्वक राऊत यांना बैठकीला पाठवले नाही. आदित्य ठाकरे यांनाही पाठवण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी दाखवली नाही. फक्त देखाव्यासाठी उबाठा गट हा इंडिया आघाडीचा घटक असल्याचे दाखवत असल्याचे बन यांनी सुनावले.
बन पुढे म्हणाले, राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून घोषित करावे, असे संजय राऊत यांना वाटतेय. तसे केले तर इंडिया आघाडीचे उरलेसुरले घटक पक्षही पळून जातील. दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे यांची इच्छा आहे की, उद्धव ठाकरे हे पंतप्रधानपदाचे उमेदवार व्हावेत. संजय राऊत विरुद्ध आदित्य ठाकरे असा हा थेट सामना आहे. संजय राऊत यांनी राहुल गांधीकडून सुपारी घेतली आहे की, मी तुम्हाला पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आणतो. त्या बदल्यात तुम्ही मला राज्यसभेची उमेदवारी द्या. आता यात आदित्य ठाकरे यशस्वी होतात का संजय राऊत हे काळच ठरवेल.
राहुल गांधींचे नेतृत्व इंडिया आघाडीतील अनेकांना मान्य नाही. राहुल गांधी आजपर्यंत 99 निवडणुका पराभूत झालेले आहेत आणि येत्या काळात शतक पूर्ण करणार आहेत. या देशातच नव्हेतर जगात हा एकमेव नेता आहे जो पराभवाचे शतक पूर्ण करतो आहे. राहुल गांधींचा उद्धटपणा आणि अहंकार हा देशातल्या जनतेने पाहिलाय. परदेशात जाऊन भारताची, इथल्या तरुणाईची बदनामी करायची. ‘आलू से सोना निकालेंगे’ अशा पद्धतीची वायफळ बडबड करायची ही राहुल गांधींची सवय असल्याने शरद पवार यांना समोर येऊन सांगावे लागत आहे की राहुल गांधींच्या नेतृत्वावर जास्त प्रश्नचिन्ह उपस्थित करू नका. पण या देशातली जनता पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये समाधानी आणि आनंदी आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवण्याचे काम इथल्या जनतेने केल्याने असे कितीही लोक एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही, असे बन यांनी ठासून सांगितले.
महापालिका निवडणुकीच्या वेळी राज ठाकरे हे महाविकास आघाडीत यावेत यासाठी संजय राऊत यांनी प्रयत्न केले होते. राज ठाकरे हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सच्चे भक्त आहेत. ज्या स्वा. सावरकरांचा काँग्रेस आणि राहुल गांधींनी सातत्याने अपमान केलाय त्या राहुल गांधीसोबत राज ठाकरे स्वप्नातही जाणार नाहीत. तुम्ही फक्त आणि फक्त खुर्चीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन करत राहुल गांधी आणि सोनिया गांधींची गुलामी करण्याची मानसिक तयारी केलीत. स्वा. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत राज ठाकरे जाणार नाही असा महाराष्ट्रातल्या जनतेला विश्वास असल्याचे बन यांनी स्पष्ट केले.







