नागपूर :- काटोल रोड परिसरातील फ्रेंड्स कॉलनी येथे असलेल्या प्लॉटच्या मालकी हक्कावरून सुरू असलेल्या वादात धर्माच्या नावाने दिशाभूल करून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप प्लॉटधारक सिमरन कोलतेवार (संकुलवार) व रोहन संकुलवार यांनी पत्रकार परिषदेत केला. पत्रपरिषदेत दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी १० सप्टेंबर २०२५ रोजी आशिष गणेश बोडखे यांच्याकडून १२०० चौरस फूट क्षेत्रफळाचा प्लॉट खरेदी केला असून त्यासंबंधीची नोंदणीकृत खरेदी- विक्री कागदपत्रे, आखीव पत्रिका, कर पावत्या व इतर आवश्यक दस्तऐवज त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. संबंधित कागदपत्रांनुसार सदर प्लॉट त्यांच्या मालकीचा असल्याचा दावा त्यांनी केला. संकुलवार दाम्पत्याच्या म्हणण्या नुसार, त्यांच्या प्लॉटसमोर सुमारे १०० चौरस फूट जागेत हनुमान मंदिर आहे. मात्र मंदिराच्या जागेचा आणि त्यांच्या मालकीच्या प्लॉटचा कोणताही संबंध नसताना काही व्यक्तींनी सदर जागा मंदिराची असल्याचा दावा करून वाद निर्माण केला आहे. तथाकथित समाजसेविका ज्वाला धोटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांमध्ये मंदिराची जागा हडपली जात असल्याचा गैरसमज पसरविल्याचा आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. आम्ही सामान्य नागरिक असून खासगी बँकेत नोकरी करतो. बँकेचे कर्ज घेऊन हा प्लॉट खरेदी केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्लॉटची नेमकी हद्द निश्चित करण्यासाठी दोन वेळा शासकीय मोजणीची मागणी करण्यात आली होती. तहसील प्रशासनाने पोलीस संरक्षणासह मोजणी पथक पाठविले होते. मात्र दोन्ही वेळा काही व्यक्तींनी शासकीय कामकाजात अडथळा आणल्यामुळे मोजणी प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नसल्याचा दावा संकुलवार यांनी केला. या प्रकरणी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून ज्वाला धोटे, सुरेंद्र तायवाडे, लक्ष्मण पाटील, प्रतीक तायवाडे, विजय गुप्ता आणि वर्षा गुप्ता यांच्याविरुद्ध अतिक्रमण (क्रिमिनल ट्रेसपासिंग) व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाल्याचे त्यांनी सांगितले. तक्रारीनुसार, संबंधित व्यक्ती प्लॉटवर येऊन अडथळा निर्माण करतात, जागेचा वापर करू देत नाहीत तसेच धमक्या देतात. याशिवाय सदर प्लॉट विकण्याबाबत दबाव टाकला जात असल्याचाही आरोप रोहन संकुलवार यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सुरू असून संबंधित पक्षाची बाजू अद्याप समोर आलेली नाही.
प्लॉट मालकी हक्काच्या वादात धर्माच्या नावाने दिशाभूल केल्याचा आरोप; संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल









