spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भंडाऱ्यात ‘चंगू-मंगू’ टोळीची दहशत संपली; कुख्यात मेश्राम बंधूंवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई

– ३५ गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या टोळीला जिल्हा पोलीस अधीक्षकांचा दणका

हंसराज,भंडारा लाखणी :- भंडारा जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यांमध्ये चोरी, घरफोडी, खंडणी आणि पोलिसांवर हल्ले करून दहशत माजवणाऱ्या कुख्यात ‘चंगू-मंगू’ टोळीचा पोलिसांनी कायमचा बंदोबस्त केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनात या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. टोळी प्रमुख भीमराज नेमीचंद मेश्राम (३२) आणि त्याचा भाऊ धम्मराज नेमीचंद मेश्राम (२९, दोघे रा. सेलोटी, ता. लाखनी) अशी कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांवर हल्ल्याचे ठरले निमित्त १३ मे २०२६ रोजी लाखनी पोलीस ठाण्याचे अंमलदार भूपेश हटवार हे कर्तव्यावर असताना त्यांना हे दोन कुख्यात आरोपी लाखनी मार्केट परिसरात संशयास्पदरीत्या फिरताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवून विचारपूस केली असता, या आरोपींनी सार्वजनिक रस्त्यावरच पोलिसांना शिवीगाळ करत हल्ला केला. आरोपींनी पोलीस अंमलदाराचा गणवेश फाडून, गळा दाबून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी लाखनी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), १२१(१), १३२, २९६, २२२, २२६, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

३५ गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी ‘चंगू-मंगू’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या या मेश्राम बंधूंवर २०१६ पासून भंडारा जिल्ह्यातील लाखनी, साकोली, पालांदूर, लाखांदूर, कारधा, अड्याळ तसेच नागपूर जिल्ह्यातील कुही आणि गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव, डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत ३५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये मोटारसायकल चोरी, घरफोडी, खंडणी वसूल करणे, खुनाचा प्रयत्न आणि लोकसेवकांवर हल्ले करणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे.

जाचातून सुटका करण्यासाठी ‘मकोका’चा बडगा या टोळीवर यापूर्वी तडीपार आणि एम.पी.डी.ए. (MPDA) अंतर्गत कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, कारागृहातून जामिनावर बाहेर येताच ही टोळी पुन्हा सक्रिय होऊन नवीन सदस्यांना सोबतीला घेऊन गुन्हे करत होती. त्यांच्या दहशतीमुळे नागरिक भयभीत होते. अखेर पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी या टोळीचा समूळ नायनाट करण्यासाठी ‘मकोका’चा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले. नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी या प्रस्तावाचा अभ्यास करून ८ जून २०२६ रोजी मकोका अंतर्गत कारवाईला मंजुरी दिली.

ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, लाखनीचे पोलीस निरीक्षक आशिष गजभिये, तत्कालीन पोलीस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर, सुभाष बारसे आणि लाखनी पोलीस पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत पोलीस प्रशासनाने दिले आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.