spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

राष्ट्रवादीचा भंडाऱ्यात धमाका: माजी आमदार राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी; कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण अन् जल्लोष

हंसराज भंडारा :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्यातील राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी अखेर ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सुनेत्रा पवार यांनी ही जागा रिक्त केल्यानंतर या जागेवर कुणाची वर्णी लागणार, याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, पक्ष नेतृत्वाने खासदार प्रफुल्ल पटेल यांचे खंदे समर्थक आणि विश्वासू सहकारी राजेंद्र जैन यांना संधी देऊन भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास दर्शवला आहे. या निर्णयामुळे भंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे भरते आले असून ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला.

प्रफुल्ल पटेलांचा शब्द आणि निष्ठावंताचा सन्मान

राज्यसभेच्या या जागेसाठी सुरुवातीला ज्येष्ठ नेते छगन भुजबळ तसेच भाजपच्या नवनीत राणा यांच्या नावाची चर्चा रंगली होती. मात्र, महायुतीच्या अंतर्गत समीकरणात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षनिष्ठेला महत्त्व देत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राजेंद्र जैन यांचे नाव आग्रहाने पुढे केले. जैन हे गेल्या अनेक वर्षांपासून गोंदिया एज्युकेशन सोसायटीचे सचिव तसेच गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून त्यांच्या नावाची मागणी होत होती, परंतु युतीच्या राजकारणात ती जागा भाजपकडे गेली होती. त्यावेळी कार्यकर्त्यांमध्ये काहीशी नाराजी होती. हीच नाराजी दूर करत आणि पटेलांच्या शब्दाचा मान राखत पक्षाने जैन यांना थेट राज्यसभेची उमेदवारी देऊन त्यांचा सन्मान केला आहे.

भंडाऱ्यात कार्यकर्त्यांचा महाजल्लोष

राजेंद्र जैन यांना उमेदवारी जाहीर होताच भंडारा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. “प्रफुल्ल पटेल आगे बढो, राजेंद्र जैन यांचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश महासचिव धनंजय दलाल, जिल्हाध्यक्षा सरिता मदनकर, महेंद्र गडकरी, तालुका अध्यक्ष नरेंद्र झंझाड, सभापती आनंद मलेवार, डॉ. रविंद्र वानखेडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “राजेंद्र जैन यांच्या रूपाने एका अभ्यासू आणि संघटन कौशल्यात माहीर असलेल्या नेत्याला राज्यसभेवर जाण्याची संधी मिळाली आहे. यामुळे भंडारा जिल्ह्यातील पक्ष संघटना अधिक मजबूत होईल,” असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

दिल्लीच्या राजकारणात जिल्ह्याचा टक्का वाढणार

राजेंद्र जैन यांनी आज सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी खासदार सुनील तटकरे, छगन भुजबळ, मंत्री दिलीप वळसे-पाटील आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांच्यासह महायुतीचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. जैन यांच्या निवडीमुळे भंडारा जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न मांडण्यासाठी आता दिल्लीत खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासोबतच अजून एक भक्कम आवाज उपलब्ध झाला आहे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्मी संचारली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.