spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पाऊस बरसला; पण मान्सूनच्या आगमनावर प्रश्नचिन्ह, हवामान तज्ज्ञांचा इशारा

नागपूर :-  राज्यातील अनेक भागांत गेल्या दोन दिवसांत मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली असली, तरी हा पाऊस खऱ्या अर्थाने नैऋत्य मोसमी पाऊस आहे का, याबाबत हवामान तज्ज्ञांनी शंका व्यक्त केली आहे. भारतीय हवामान विभागाने ६ जून रोजी दक्षिण कोकणात आणि ८ जून रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली. मात्र, मान्सूनच्या प्रस्थापित निकषांची पूर्तता अद्याप झालेली नसल्याचे हवामान संशोधकांचे मत आहे.

रविवारी रात्रीपासून सोमवारी पहाटेपर्यंत राज्यातील विविध भागांत पावसाची नोंद झाली. सांगली येथे ८३ मिमी, धाराशिव येथे ५७ मिमी तर सोलापूर येथे ८ मिमी पाऊस झाला. या पावसानंतर मान्सूनच्या प्रगतीबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असले, तरी हवामान अभ्यासकांनी सावध भूमिका घेतली आहे.

मान्सूनच्या निकषांची पूर्तता नाही?

तज्ज्ञांच्या मते, एखाद्या भागात मान्सून दाखल झाल्याची घोषणा करण्यासाठी केवळ पावसाची नोंद पुरेशी नसते. जमिनीपासून सुमारे ३ हजार मीटर उंचीपर्यंत अरबी समुद्रातून येणारे मोसमी वारे सक्रिय असणे, तापमानात लक्षणीय घट होणे, आकाशात सातत्यपूर्ण ढगांचे आच्छादन राहणे आणि दिवस-रात्र विविध वेळांत पाऊस पडणे आवश्यक असते.

सध्या दक्षिण मध्य महाराष्ट्रात या निकषांची स्पष्ट पूर्तता झालेली दिसत नाही. उलट, सोलापूरमध्ये ३८ अंश सेल्सिअस तर सांगलीमध्ये ३५.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. मान्सून सक्रिय झाल्यानंतर अपेक्षित असलेली तापमानातील घट अद्याप जाणवत नसल्याचेही अभ्यासकांनी नमूद केले.

शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय

हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून आणखी पुढे सरकण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, काही हवामान संशोधकांच्या मते येत्या काळात पावसाचा जोर कमी होण्याची, तापमान वाढण्याची आणि मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या खरीप हंगामाच्या पेरणीचा निर्णायक कालावधी सुरू आहे. अशा परिस्थितीत मान्सून दाखल झाल्याच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पेरणी केली आणि त्यानंतर पावसाने पुन्हा खंड दिला, तर उगवलेल्या पिकांना मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाईघाईने निर्णय न घेता स्थानिक हवामानाचा अंदाज आणि तज्ज्ञांच्या सूचनांचा विचार करूनच पेरणीचे नियोजन करावे, असा सल्ला हवामान अभ्यासकांनी दिला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.