spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

तुमसर पोलिसांची कारवाई! देव्हाडी येथील ७ दुकानांचे शटर फोडणारे अट्टल चोरटे २४ तासांत गजाआड

हंसराज,भंडारा तुमसर :- तुमसर रोड देव्हाडी रेल्वे स्थानक परिसर आणि गांधी वॉर्ड भागात एकाच रात्री तब्बल सात दुकाने फोडून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात तुमसर पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे, गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत दोन संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देव्हाडी येथील रेल्वे स्टेशन समोरील दोन दुकाने आणि गांधी वॉर्डातील दोन दुकानांचे शटर वाकवून चोरट्यांनी आत प्रवेश केला. यावेळी फिर्यादी प्रमिला किसन सोनवाने यांच्या चहा-पानाच्या टपरीतून ५ हजार रुपये आणि शेजारील रामू बंधाटे यांच्या दुकानातून ३०० रुपये रोख लंपास केले. एवढ्यावरच न थांबता चोरट्यांनी स्टेशन परिसरातील शहारे यांचे ‘साईबाबा उपहारगृह’ आणि ‘कावळे ट्रेडर्स’ या दुकानांचेही शटर वाकवून अनुक्रमे १२०० आणि ५००० रुपये अशी चिल्लर व रोख रक्कम चोरली. तसेच इतर तीन दुकानांमध्ये चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला.

एकाच रात्री सात ठिकाणी घरफोडी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण होते. घटनेचे गांभीर्य ओळखून तुमसर पोलीस स्टेशनचे पथक तातडीने तपासासाठी रवाना झाले. पोलीस हवालदार शिवाजी कनोजिया, पोलीस शिपाई निखिल बिसने आणि डी.बी. पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला. स्थानिक रहिवाशांच्या मदतीने आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरातून दोन संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरीला गेलेली रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

या प्रकरणी तुमसर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींविरुद्ध अपराध क्रमांक ७४८/२०२६ आणि ७४९/२०२६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५(अ) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सदर कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक मयंक माधव, पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपासात सपोनि आकाशकुमार साखरे, डी.बी. पथकाचे गिरीपुंजे, बावने, दमाहे, झंझाड यांनी मोलाची भूमिका बजावली. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि आकाशकुमार साखरे करत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.