spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

साकोली पोलिसांची मोठी कारवाई; ९ लाखांच्या सुगंधित तंबाखू व गुटख्यासह दोघांना अटक

हंसराज,भंडारा साकोली :- साकोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी सुगंधित तंबाखू आणि गुटख्याच्या तस्करीवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत साकोलीतील एक नामांकित किराणा व्यापारी आणि देवरी येथील पुरवठादार अशा दोघांना अटक करण्यात आली असून, एकूण ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, साकोलीचे पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांनी आपल्या पथकासह मौजा शेंदूरवाफा येथे सापळा रचला होता. यावेळी देवरी येथून साकोलीकडे येणाऱ्या मारुती इको कारला (क्रमांक MH 35 AR 7965) अडवून तिची झडती घेण्यात आली. या वाहनात ३ लाख ५० हजार रुपये किमतीचा अवैध सुगंधित तंबाखू आणि गुटखा आढळून आला. पोलिसांनी चालक मोहित मदन कापसे (वय ३०, रा. देवरी) याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, हा माल साकोलीतील किराणा व्यापारी तरुण राजकुमार मल्लानी (वय ४०) याला विक्रीसाठी नेला जात असल्याचे समोर आले.

या माहितीवरून पोलिसांनी तातडीने व्यापारी तरुण मल्लानी याच्या घरावर छापा टाकला. तेथे ५ लाख ५० हजार रुपये किमतीचा अतिरिक्त सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला. या कारवाईत वाहन आणि गुटखा असा एकूण ९ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

अन्न सुरक्षा विभाग, भंडारा यांच्याकडून जप्त केलेल्या मालाची तांत्रिक तपासणी करण्यात आली. सॅम्पलमध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि गुटखा असल्याचे निष्पन्न झाले आहे. यानुसार दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अन्न सुरक्षा कायदा २००६ मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे, पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर, उपनिरीक्षक प्रशांत वडुले व पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.