spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

दुर्गम नेलगुंडा येथे शाळा व विकास कामांसाठी हेमलकसा प्रकल्पाला शासकीय जमीन मंजूर

– महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील मौजा नेलगुंडा या दुर्गम भागात शाळा व इतर विकासात्मक उपक्रमांसाठी शासकीय जमीन मंजूर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष पुढाकारामुळे हा निर्णय मार्गी लागला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

महसूल व वन विभागाने ११ जून २०२६ रोजी जारी केलेल्या शासन आदेशानुसार मौजा नेलगुंडा, तालुका भामरागड येथील सर्वे क्रमांक ९३ मधील ०.२० हेक्टर आर शासकीय जमीन शाळा आणि इतर विकासात्मक उपक्रमांसाठी महारोगी सेवा समिती, वरोरा यांना मंजूर करण्यात आली आहे. या संदर्भात पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी शासनाकडे मागणी केली होती.

गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागात लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासी समाजासाठी शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक विकासाचे कार्य गेल्या अनेक दशकांपासून सुरू आहे. नेलगुंडा परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे, शाळेच्या पायाभूत सुविधा वाढाव्यात आणि विकासात्मक उपक्रमांना गती मिळावी, यासाठी ही जमीन आवश्यक होती.

या मागणीची दखल घेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित विभागांशी सातत्याने पाठपुरावा केला. विभागीय आयुक्त नागपूर आणि अहेरी येथील महसूल प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावांचा सकारात्मक विचार करून शासनाने अखेर जमीन मंजुरीचा निर्णय घेतला.

या निर्णयामुळे नेलगुंडा आणि परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असून, लोकबिरादरी प्रकल्पाच्या विविध विकासात्मक उपक्रमांना मोठी चालना मिळणार आहे. दुर्गम भागातील शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी हा निर्णय मैलाचा दगड ठरणार असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, या निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आणि संवेदनशील भूमिकेबद्दल त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारामुळे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पाठबळामुळे आदिवासी भागातील विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेल्याचे मानले जात आहे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन दुर्गम व आदिवासी भागांतील शिक्षण आणि विकासाला प्राधान्य देत आहे. महारोगी सेवा समितीने अनेक वर्षांपासून समाजहितासाठी केलेल्या कार्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असून नेलगुंडा आणि परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध होतील तसेच सामाजिक विकासाच्या विविध उपक्रमांना गती मिळेल.

– चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.