जलालखेडा :- नागपूर परिमंडळातील काटोल विभाग अंतर्गत जलालखेडा येथे तांत्रिक कामगार युनियनच्या वतीने जाहीर प्रवेश कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी संघटनेची ध्येयधोरणे, कार्यपद्धती, तांत्रिक कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सातत्याने केलेला संघर्ष व पाठपुरावा याची माहिती उपस्थित कामगारांना देण्यात आली. संघटनेच्या कार्यावर विश्वास व्यक्त करत जलालखेडा येथील विद्युत सहाय्यक व तांत्रिक कामगारांनी तांत्रिक कामगार युनियनमध्ये जाहीर प्रवेश केला. यामुळे नागपूर परिमंडळात संघटनेची ताकद अधिक बळकट झाली आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय सरचिटणीस प्रभाकर लहाने होते. प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून राज्य सचिव प्रकाश निकम, केंद्रीय संघटक महेश हिवराळे, तांत्रिक अप्रेंटिस कामगार असोसिएशनचे राज्याध्यक्ष विकी कावळे तसेच कोषाध्यक्ष राम कुटे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रादेशिक सचिव जयंत तुपकर, झोनल सचिव कैलास सटवे, युवा तांत्रिक कामगार संघटनेचे पदाधिकारी योगेश धांडे व गणेश बगडे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी तांत्रिक कामगारांच्या हक्कांसाठी संघटनेची लढाऊ भूमिका कायम राहील तसेच कामगारांच्या न्याय्य प्रश्नांसाठी संघर्ष व पाठपुरावा अधिक तीव्र करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमास मोठ्या संख्येने तांत्रिक कामगार उपस्थित होते.








