spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भंडारा पोलिसांची मोठी कारवाई; गोवंशाची अवैध वाहतूक करणारे दोन ट्रक पकडले, ३२ लाख ५० हजाराचा चा मुद्देमाल जप्त

हंसराज,भंडारा :- रायपुर-नागपूर महामार्गावरून गोवंशाची अत्यंत क्रूरपणे आणि बेकायदेशीररीत्या वाहतूक करणाऱ्या दोन आयशर ट्रक्सवर भंडारा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत २५ गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली असून, ट्रक्ससह एकूण ३२,५०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा पोलीस स्टेशनच्या डीबी पथकातील सपोनि बोरकर, पो.शि. राठोड आणि पो.शि. अंबादे हे रात्रगस्त घालत असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, रायपूर ते नागपूर मार्गावरून दोन आयशर ट्रकमध्ये गोवंश जातीची जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने अत्यंत निर्दयपणे कोंबून नेली जात आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ भंडारा शहर बायपासवरील कोरंबी पुलावर नाकाबंदी केली.

या नाकाबंदी दरम्यान संशयास्पद वाटणारे एम.एच. ४० सीएम २०२४ आणि एम.एच. ४० सीटी २५०३ या क्रमांकाचे दोन आयशर ट्रक थांबवून त्यांची झडती घेण्यात आली. यावेळी एका ट्रकमध्ये १२ आणि दुसऱ्या ट्रकमध्ये १३ अशी एकूण २५ जनावरे आढळून आली. या जनावरांचे पाय आणि तोंड दोरीने अत्यंत घट्ट बांधून त्यांना ट्रकमध्ये निर्दयतेने कोंडण्यात आले होते. पोलिसांनी या कारवाईत २,५०,००० रुपये किमतीची २५ जनावरे आणि प्रत्येकी १५ लाख रुपये किमतीचे दोन ट्रक असा एकूण ३२ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी अनिल रामदास पातोड (४२, रा. नागपूर), जाहीद हीदायद खान (४८, रा. चंगेरा, जि. गोंदिया), तिलकबंद भागवत बोरकर (४१, रा. नागपूर) आणि शाहरूख अकबर अली सय्यद (३६, रा. छोटा रजेगाव, जि. गोंदिया) या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींविरुद्ध कलम ५ (अ),(ब) महाराष्ट्र पशू संवर्धन कायदा कलम ११ डी एफ , प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११९ आणि मोटर वाहन अधिनियम ८३/१७७ कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, आणि पोलीस निरीक्षक भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि बोरकर व त्यांच्या पथकाने केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भंडारा पोलीस करीत आहेत.

Popular Articles