हंसराज,भंडारा :- राज्यातील बालक व किशोरवयीन मुलांच्या आरोग्यदायी भविष्याच्या दृष्टीने भंडारा जिल्ह्याने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पूर्वी प्रामुख्याने प्रौढांमध्ये आढळणारे असंसर्गजन्य आजार (NCDs) आता बालकांमध्येही वाढत्या प्रमाणात दिसून येत असून, राज्यातील सुमारे ६० लाख बालके व किशोरवयीन या आजारांच्या जोखमीखाली असल्याचे निदर्शनास आले आहे.
या पार्श्वभूमीवर बालकांमधील असंसर्गजन्य आजारांचे लवकर निदान व वेळेवर उपचार सुनिश्चित करण्यासाठी बालकातील असंसर्गजन्य आजार (Childhood NCDs) कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय, भंडारा येथे युनिसेफ आणि एम्स, नागपूर यांच्या सहकार्याने ‘बालकातील असंसर्गजन्य आजार दवाखाना’ (Childhood NCD Clinic) सुरू करण्यात आला आहे.
या दवाखान्यात ० ते १८ वर्षे वयोगटातील बालके व किशोरवयीन मुलांसाठी लठ्ठपणा, टाइप-१ मधुमेह, मानसिक आरोग्याच्या समस्या, दमा, सिकल सेल आजार तसेच जन्मजात हृदयविकार यांसारख्या असंसर्गजन्य आजारांची तपासणी, निदान, उपचार आणि नियमित व्यवस्थापनाच्या सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
याशिवाय, आवश्यकतेनुसार एम्स, नागपूर येथील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, विशेष उपचार सेवा, समुपदेशन तसेच कुटुंबीयांसाठी आवश्यक सल्ला व मार्गदर्शनही उपलब्ध करून दिले जाणार आहे.
या उपक्रमामुळे बालकांमधील असंसर्गजन्य आजारांचे लवकर निदान होऊन वेळेवर उपचार मिळण्यास मदत होईल. परिणामी त्यांच्या आरोग्यपूर्ण वाढ व विकासाला चालना मिळून निरोगी व सुदृढ भविष्य घडविण्यास हातभार लागणार आहे.
भंडारा जिल्ह्यात हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संदीप गजभिये आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे यांनी विशेष प्रयत्न केले.








