spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

तरुणांचा आयटीआयकडे ओढा वाढला; जिल्ह्यात प्रवेश प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद

हंसराज भंडारा :- कौशल्याच्या युगात जिल्ह्यातील तरुण-तरुणींचा औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) विविध अभ्यासक्रमांकडे कल लक्षणीयरीत्या वाढत असून, ऑगस्ट २०२६ सत्रासाठी सुरू असलेल्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत सुरू असलेल्या या प्रक्रियेत जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ६३९ उमेदवारांनी आपले अर्ज निश्चित केले आहेत. ऑनलाईन अर्ज निश्चित करण्याची अंतिम मुदत २२ जून २०२६ असून, पात्र विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर. बी. गणवीर यांनी केले आहे.

भंडारा जिल्ह्यात एकूण ८ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असून त्यांची प्रवेश क्षमता १ हजार ५७६ आहे. तसेच ३३ खाजगी आयटीआय संस्थांमध्ये १ हजार ४४८ जागा उपलब्ध आहेत. जिल्ह्यात एकूण ३० विविध रोजगार व स्वयंरोजगारक्षम ट्रेड्स उपलब्ध असून, एकूण ३ हजार २४ जागांसाठी गुणवत्तेच्या प्राधान्यक्रमानुसार प्रवेश दिले जाणार आहेत.

बदलत्या तंत्रज्ञानाची गरज ओळखून संचालनालयाने यंदापासून ‘सोलर टेक्निशियन’ हा नवा ट्रेड सुरू केला आहे. अक्षय ऊर्जा क्षेत्रात वाढत्या संधी लक्षात घेता विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.

प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सर्व आयटीआय संस्थांमध्ये समुपदेशन व मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. जिल्हास्तरावरील समन्वय व समस्या निवारणासाठी शासकीय आयटीआय भंडारा येथील गटनिर्देशक एम. एस. बदुकले यांची जिल्हा प्रवेश समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण यंत्रणा कार्यरत आहे.

दरम्यान, भंडारा आयटीआयने राज्यस्तरीय कौशल्य विकास स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून राष्ट्रीय स्तरावरही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. संस्थेच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

“जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणाबरोबरच कौशल्याभिमुख आयटीआय अभ्यासक्रमांना प्राधान्य द्यावे. या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करून स्वतःबरोबरच जिल्ह्याच्या विकासात योगदान द्यावे,” असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर. बी. गणवीर यांनी केले आहे.

प्रवेश प्रक्रियेबाबत अधिकृत व अद्ययावत माहितीसाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.