– भाजपा दिव्यांग विकास आघाडी व दिव्यांग जनसंवाद फाउंडेशनची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
हंसराज,भंडारा :- राज्यातील दिव्यांग बांधवांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडी, महाराष्ट्र प्रदेश व दिव्यांग जनसंवाद फाउंडेशनच्या वतीने ‘३६ जिल्हे – ९ महिने निवेदन अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आज भंडारा येथे जिल्हाधिकारी सावन कुमार यांना दिव्यांग बांधवांच्या ५५ प्रमुख मागण्यांसह स्थानिक स्तरावरील २५३ समस्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
हे आंदोलन भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे विदर्भ प्रभारी तथा दिव्यांग जनसंवाद फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अम्मोल देवाजी वाळके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, मोहाडी, पवनी, साकोली, लाखनी व लाखांदूर या सातही तालुक्यांतून ३५० हून अधिक दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महत्त्वपूर्ण मागण्यांवर भर जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या ५५ मागण्यांच्या निवेदनात प्रामुख्याने दिव्यांग पेन्शन दर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत जमा करणे, पेन्शनच्या रकमेत वाढ करणे, प्रत्येक जिल्ह्यात किमान १००० वर्क फ्रॉम होम रोजगार संधी उपलब्ध करून देणे, दिव्यांगांना प्रतिमहा १५,००० रुपये मानधन किंवा शासकीय नोकरी देणे, २५ वर्षांनंतरच्या दिव्यांगांना स्थायी प्रमाणपत्र देणे, तसेच व्यवसायासाठी १० लाख रुपयांपर्यंतचे बिनतारण कर्ज उपलब्ध करून देणे अशा विविध मागण्यांचा समावेश आहे.
स्थानिक २५३ समस्यांचे स्वतंत्र निवेदन राज्यस्तरीय मागण्यांसोबतच भंडारा जिल्ह्यातील स्थानिक प्रश्नांकडेही प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. ग्रामपंचायतींमधील दिव्यांगांसाठी राखीव असलेला ५ टक्के निधी खर्च न होणे, जिल्हा सामान्य रुग्णालयात UDID कार्ड व प्रमाणपत्र प्रक्रियेत दिव्यांगांना होणारा मनस्ताप, तासन्तास करावी लागणारी प्रतीक्षा आणि सार्वजनिक ठिकाणी सुलभतेचा अभाव अशा २५३ स्थानिक तक्रारींचे स्वतंत्र निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
उपस्थित पदाधिकारी याप्रसंगी मेघा वाळके (नागपूर विभाग अध्यक्ष), रेणुका बोबडे, पूर्वी चौरसिया, प्रमोद राऊत (राज्य उपाध्यक्ष), पुष्पेंद्र कश्यप, राहुल बोडखे, ललिता गोतमारे, अपर्णा खोडे, प्रसिद्धी प्रमुख वैशाली शेळके, कु.सरिता रंगारी, विजय मेहर, दीपिका परतेकी, शीतल नेरकर, सुरेश भांडारकर (शहर अध्यक्ष, भंडारा), अजय तारेकर यांच्यासह दादाराव चौरे, अमृता अधावडे, नेहा बडसाइत, विकास मतलानी, तुषार बोकडे, रोशन वंजारी, गुड्डू नेरकर व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
“दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी आणि सन्मानासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात हे अभियान राबवत आहोत. भंडारा जिल्ह्यातील प्रशासनाने या समस्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन दिव्यांगांना न्याय द्यावा. जर या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले, तर आगामी काळात राज्यभर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
– अम्मोल देवाजी वाळके (राष्ट्रीय अध्यक्ष, दिव्यांग जनसंवाद फाउंडेशन)




