हंसराज भंडारा :- जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध भंडारा पोलिसांनी आपली मोहीम तीव्र केली असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा चिखली येथे धाड टाकून अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या एका मिनी टिप्परवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण २२ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पाटील हे आपल्या ताफ्यासह गस्तीवर असताना त्यांना एका गोपनीय खबऱ्याकडून मौजा चिखली येथे अवैध रेतीची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी चिखली शिवारात सापळा रचून धाड टाकली असता, अक्षय रामप्रसाद राऊत (२१, रा. चांदमारा, ता. तुमसर) हा तरुण शासनाचा कोणताही परवाना नसताना टाटा कंपनीच्या मिनी टिप्परमधून (क्रमांक MH 36 AA 4813) अवैधरीत्या रेतीची वाहतूक करताना आढळून आला. पोलिसांनी सदर टिप्परची पाहणी केली असता, त्यात अंदाजे २ ब्रास रेती मिळून आली. या कारवाईत २२ लाख रुपये किमतीचा मिनी टिप्पर आणि १२ हजार रुपयांची रेती असा एकूण २२ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी फिर्यादी पोउपनि. पाटील यांच्या लेखी तक्रारीवरून आरोपी अक्षय राऊत याच्या विरुद्ध गोबरवाही पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा (अ.क्र. ३२८/२०२६) नोंदवण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. पाटील व त्यांच्या पथकाने पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास गोबरवाही पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.







