spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

हातावरील जखमेच्या डागामुळे उमेदवाराला नोकरीसाठी अपात्र ठरविणे बेकायदेशीर

– उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नागपूर :- केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील (CAPF) कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज केलेल्या नागपूरच्या एका तरुणीला हातावरील हायपरट्रॉफिक स्कार असल्याच्या कारणावरून वैद्यकीय दृष्ट्या अपात्र ठरविण्यात आले होते. मात्र, या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द ठरवत उमेदवाराला दिलासा दिला आहे. हातावरील जखमेच्या डागामुळे उमेदवाराला नोकरीसाठी अपात्र ठरविता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा न्यायालयाने दिला. अर्चंती यांनी कर्मचारी निवड आयोगाच्या भरती प्रक्रियेत सहभाग घेतला होता. शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि इतर सर्व टप्पे त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले. त्यानंतर झालेल्या वैद्यकीय तपासणीत प्रथमदर्शनी त्यांना अपात्र घोषित करण्यात आले. पुनर्वैद्यकीय तपासणीतही उजव्या हातावरील हायपरट्रॉफिक स्कारचे कारण देत त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली. याचिकाकर्त्यांनी न्यायालयात दावा केला की, एम्स नागपूरच्या वैद्यकीय अहवालानुसार हा व्रण संसर्गजन्य नसून उपचारक्षम आहे. तसेच भरती जाहिरातीत अशा प्रकारच्या व्रणाचा अपात्रतेच्या निकषांमध्ये कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही.

सुनावणी दरम्यान न्यायालयाने यापूर्वीच्या विविध न्यायालयीन निर्णयांचा संदर्भ देत स्पष्ट केले की, केलॉइड किंवा हायपरट्रॉफिक स्कार हा कार्यक्षमतेवर परिणाम करणारा शारीरिक दोष मानला जात नाही. त्यामुळे केवळ त्या कारणावरून उमेदवाराला अपात्र ठरविणे योग्य नाही. न्यायमूर्ती वाय.जी.खोब्रागडे आणि न्यायमूर्ती सुशील घोडेस्वर यांच्या खंडपीठाने १३ नोव्हेंबर २०२४ रोजीच्या पुनर्वैद्यकीय मंडळाच्या अहवालाला रद्द ठरविले. तसेच याचिकाकर्ती इतर सर्व निकषांमध्ये पात्र असल्यास तिच्या उमेदवारीचा पुनर्विचार करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले. या निर्णयामुळे केंद्रीय सुरक्षा दलांच्या भरती प्रक्रियेत वैद्यकीय अपात्रतेच्या निकषांबाबत महत्त्वाचा न्यायनिवाडा झाला असून, अशाच कारणांमुळे अपात्र ठरलेल्या उमेदवारांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या प्रकरणात पीडित तरुणीची बाजू अँड. राजेंद्र साहू, अँड. गुरप्रीतसिंग चंडोक आणि अँड. गौरव साहू यांनी मांडली.

Popular Articles