spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तक्रारींची चौकशी केली जाईल; नेत्र रुग्णालयासाठी नवीन इमारत उभारणार–वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई :- नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निधीचा विनियोग पारदर्शक व नियमांनुसार होण्याबाबतच्या तक्रारींची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. तसेच नेत्र रोग विभागाच्या इमारतीच्या संरचनात्मक लेखापरीक्षणासाठी (स्ट्रक्चरल ऑडिट) आवश्यक शुल्क जमा करण्यात आले आहे. लेखापरीक्षणात इमारत असुरक्षित अथवा जीर्ण असल्याचे निदर्शनास आल्यास तातडीने नवीन नेत्र रुग्णालयाची इमारत उभारण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

विधानसभा सदस्य मोहन मते यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य नितीन राऊत, विकास ठाकरे, प्रवीण दटके यांनी सहभाग घेतला. त्यास उत्तर देताना ते बोलत होते.

मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले की, सदस्यांनी उपस्थित केलेल्या विशिष्ट तक्रारी शासनाने गांभीर्याने घेतल्या असून, 23 जून 2026 रोजी चौकशी समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीला तक्रारींची चौकशी करून एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एमआरआय, सीटी स्कॅन, एक्स-रे, कॅथलॅब, किडनी प्रत्यारोपण, लिव्हर प्रत्यारोपण, रोबोटिक शस्त्रक्रिया, कॉक्लियर इम्प्लांट, मिल्क बँक आणि न्यूक्लियर मेडिसिन यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. मुख्यमंत्री यांचे या रुग्णालयाकडे आणि त्यातील सुविधांकडे सातत्याने लक्ष असल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

महाविद्यालयाच्या इमारतींची बांधकामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत (पीडब्ल्यूडी) करण्यात येतात. असे नमूद करून मंत्री मुश्रीफ म्हणाले की, सदस्यांनी तक्रारींची सविस्तर माहिती उपलब्ध करून दिल्यास त्यांची चौकशी केली जाईल. तसेच चांगल्या कामगिरी करणाऱ्या डॉक्टरांना आवश्यक ती सुरक्षा पुरविण्याची जबाबदारी विभाग घेईल.

Popular Articles