spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सावनेरमध्ये शासकीय अधिकाऱ्यांना योगदिनाचा विसर; पतंजली योग समिती आक्रमक

– तहसीलसह ६ विभागांनी फिरवली योगदिनाकडे पाठ

सावनेर :- केंद्र शासनाच्या वतीने २०१५ पासून २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ म्हणून घोषित करण्यात आला असून, देशातील प्रत्येक शासकीय व निमशासकीय कार्यालयात हा दिवस साजरा करण्याचे स्पष्ट आदेश आहेत. मात्र, सावनेर येथील तहसील कार्यालय, भूमिअभिलेख, पाठबंधारे विभाग, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तालुका आरोग्य विभागाच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे या अत्यंत महत्त्वाच्या दिवसाची अवहेलना झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या सात ही कार्यालयांतील अधिकाऱ्यांनी योगदिन साजरा न केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दरवर्षी २१ जून रोजी सावनेर शहरातील सर्व शासकीय व निमशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच पतंजली योग समिती सावनेरच्या माध्यमातून एकत्र येऊन मोठ्या उत्साहात योगदिन साजरा करतात. संपूर्ण जगभरात कोट्यवधी नागरिक या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होत असताना, यावर्षी मात्र तहसील कार्यालय, भूमिअभिलेख, पाठबंधारे विभाग, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तालुका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे पूर्णपणे पाठ फिरवली.

शासकीय आदेशाला केराची टोपली

केंद्र व राज्य शासनाचे स्पष्ट निर्णय व आदेश असतानाही, सावनेर येथील संबंधित अधिकाऱ्यांनी योगदिन साजरा न करून थेट शासनाच्या निर्णयाचीच अवहेलना केली आहे. अधिकाऱ्यांच्या या हेकेखोर आणि उदासीन वृत्तीमुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष

योगदिनाची आणि थेट शासनादेशाची उघडपणे अवहेलना करणाऱ्या सावनेरच्या या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर नागपूरचे जिल्हाधिकारी आता काय कारवाई करणार? याकडे संपूर्ण सावनेरकरांचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया…

“संपूर्ण जगाला निरोगी आरोग्याचा संदेश देणाऱ्या योगदिनाचा शासकीय अधिकाऱ्यांनाच विसर पडावा, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हायलाच हवी.”

— भरत थापा, तालुका प्रभारी पतंजलि योग समिती,सावनेर

Popular Articles