कामठी :- २८ जून २०२६ रोजी रणाळा गावात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देण्यासाठी उभारण्यात आलेल्या सर्व लसीकरण केंद्रांना गावाचे सरपंच पंकज साबळे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन मोहिमेची पाहणी केली.
यावेळी त्यांच्या समवेत स्वाती साबळे तसेच त्यांचा ४ वर्षीय मुलगा अभ्यंत साबळे उपस्थित होता. त्यांनी पंकज मंगल कार्यालय, अंगणवाडी क्र. १ (जुनी वस्ती), अंगणवाडी क्र. २ (ओम नगर) आणि अंगणवाडी क्र. ३ (सईद नगर) या सर्व लसीकरण केंद्रांना भेट देऊन आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविकांशी संवाद साधला.
सरपंचांनी मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल आरोग्य विभागाचे कौतुक केले तसेच गावातील प्रत्येक ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकाला पोलिओची लस देण्याचे आवाहन पालकांना केले. या मोहिमेच्या यशस्वी आयोजनासाठी आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका आणि सर्व सहकाऱ्यांचे आभारही व्यक्त करण्यात आले.




