spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला कामठी तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद; २२३ लसीकरण केंद्रांवर २६,८०० बालकांसाठी डोसचे उद्दिष्ट

कामठी :- राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला कामठी तालुक्यात रविवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहर व ग्रामीण भागातील एकूण २२३ लसीकरण केंद्रांवर सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्यात आला. या मोहिमेत २६ हजार ८०० बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.

जागतिक आरोग्य संघटनेने १९८८ मध्ये पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्चित केल्यानंतर राज्यात १९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम सातत्याने राबविली जात आहे. भारतात १३ जानेवारी २०११ नंतर आजपर्यंत एकही पोलिओ रुग्ण आढळलेला नसल्याची माहिती तहसीलदार गणेश जगदाळे यांनी दिली.

शासकीय उपजिल्हा रुग्णालय, कामठी येथे तहसीलदार गणेश जगदाळे यांच्या हस्ते एका बालकाला पोलिओचे दोन थेंब पाजून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश मोटे, शासकीय उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. निशात शेख, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शबनम खानुनी तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कामठी शहरातील शासकीय उपजिल्हा रुग्णालय व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ६७ केंद्रांवर ११,२५३, गुंमथळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ४९ केंद्रांवर ४,५५५, भुगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ४६ केंद्रांवर ३,६३७, तर गुमथी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ७,३५५ बालकांना पोलिओ डोस देण्याचे नियोजन करण्यात आले होते. दिवसभरात बहुतांश बालकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले.

जे बालक काही कारणास्तव पोलिओ डोसपासून वंचित राहिले आहेत, त्यांना आरोग्य विभागाच्या पथकांकडून घरभेट देऊन लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

याशिवाय मोबाईल व्हॅन, ट्रान्झिट बूथ, रेल्वे स्थानक, बसस्थानक, पंचायत समिती कार्यालय, हुतात्मा स्मारक आदी ठिकाणीही विशेष लसीकरण केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या पाल्यांना पोलिओचे दोन थेंब पाजून मोहिमेला यशस्वी सहकार्य केले.

आरोग्यदायी व पोलिओमुक्त भारताच्या दिशेने हे अभियान महत्त्वाचे पाऊल असून, ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक डोस देण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन तहसीलदार गणेश जगदाळे यांनी आरोग्य विभागाच्या वतीने केले.

Popular Articles