पांढरकवडा :- पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत वाहनातून अवैध विदेशी दारूची तस्करी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत विदेशी दारूसह कार असा एकूण १ लाख ८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पोलिसांना मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, सिल्व्हर रंगाच्या मारुती सुझूकी अल्टो (एमएच-२९ आर-२६५३) या कारमधून पांढरकवडा वरून अर्ली येथे विक्रीसाठी विदेशी दारू नेली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक एल.डी.तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर व पथकाने आरटीओ तपासणी नाका, पाटणबोरी राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ येथे सापळा रचून वाहनाची तपासणी केली. यावेळी वाहनातून ऑफिसर्स चॉइस ब्ल्यूच्या १८० मिलीच्या ५० बाटल्या (किंमत ११ हजार रुपये), रॉयल स्टॅगच्या १८० मिलीच्या २० बाटल्या (किंमत ५ हजार रुपये) तसेच ऑफिसर्स चॉइस ब्ल्यूची २ लिटर क्षमतेची एक प्लास्टिक बाटली (किंमत २ हजार २५० रुपये) असा एकूण १८ हजार २५० रुपयांचा विदेशी मद्यसाठा आढळून आला. या प्रकरणी अजय देवराव तुमाने (वय २९, रा. घुबडी, ता. केळापूर ) व सुरेश भास्कर ओसावार (वय ४४, रा. अर्ली, ता. केळापूर ) यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील ९० हजार रुपयांची कार जप्त करण्यात आली. दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(अ)(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबीन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे, पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.








