spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गडचिरोली पोलिसांकडून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक सहलीचे आयोजन

 

गडचिरोली, ३० : गडचिरोली पोलीस दलाने आपल्या विविध सामाजिक उपक्रमांचा भाग म्हणून आज दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी एका विशेष शैक्षणिक सहलीचे आयोजन केले होते. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला, ज्यामध्ये निवासी अपंग विद्यालय, लांजेडा; निवासी मूक व बधिर विद्यालय, गडचिरोली; आणि कौसल्या निवासी मतिमंद विद्यालय, बोदली येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश समाजातील प्रत्येक घटकाला मुख्य प्रवाहात आणून त्यांचे जीवनमान सुधारणे हा आहे. या विशेष शैक्षणिक सहलीदरम्यान, विद्यार्थ्यांनी पोलीस मुख्यालय, शस्त्रागार, विशेष अभियान पथक आणि आयुध कर्मशाळा यांना भेटी दिल्या. या भेटींमुळे विद्यार्थ्यांना पोलीस दलाची शिस्तबद्धता, विविध शस्त्रांची माहिती आणि हाताळणी अनुभवता आली. यातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होऊन, त्यांच्यात सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.

यावेळी आयोजित कार्यक्रमात, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्कूलबॅग, कंपास, एलसीडी पॅनल बोर्ड, शैक्षणिक तक्ते यांसारखे अत्यावश्यक शैक्षणिक साहित्य, तसेच क्रिकेट साहित्य, फुटबॉल, रुबीक्स क्यूब, लगोरी यांसारखे खेळाचे साहित्य प्रदान करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, “सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःविषयी आत्मविश्वास बाळगून भविष्याप्रती सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. आजच्या युगात अनेक दिव्यांग व्यक्तींनी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत केंद्रीय लोकसेवा आयोगासारख्या कठीण परीक्षांमध्ये यश संपादन केले आहे. त्याचप्रमाणे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनीही मोठे ध्येय ठेवून यश मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहावे.”

या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे, तसेच सरस्वती विद्यालय, लांजेडा आणि बोदली येथील संबंधित शाळांचे मुख्याध्यापक व अधीक्षक उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रापोनि. अनुजकुमार मडामे, पोलीस कल्याण शाखेचे पोउपनि. नरेंद्र पिवाल, पोउपनि. संतोष कोळी तसेच पोलीस मुख्यालय आणि पोलीस कल्याण शाखेचे अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

Popular Articles