नागपूर ३० : दहशतवादी घटनांना तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा दलांची तयारी अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दल (NSG) यांच्या मार्गदर्शनाखाली ‘प्रथम प्रतिसाद कर्त्यासाठी दहशतवादी घटनांविरुद्ध प्रतिसाद व जागरूकता प्रशिक्षण’ (Counter Terrorist (CT) Incident Response and IED Awareness Training for First Responder by NSG) कार्यशाळा २८ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता पोलिस भवन, ऑडिटोरियम हॉल, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे आयोजित करण्यात आली होती.
या प्रशिक्षणाचे सादरीकरण NSG, मुंबईचे असिस्टंट कमांडंट, विनीत मेश्राम यांनी केले. या कार्यशाळेत NSG च्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी दहशतवादाच्या संभाव्य धोका परिस्थितींमध्ये प्रथम प्रतिसाद देण्याच्या कौशल्यांची सविस्तर माहिती दिली. यामध्ये प्रत्यक्ष शंका-समाधान सत्र आणि विविध प्रकारच्या सुरक्षात्मक उपाययोजनांचा समावेश होता. दहशतवादाला आळा घालण्यासाठी आणि अशा प्रसंगांचा सामना करताना कोणती उपाययोजना राबवावी, याबाबत मार्गदर्शन करून उपस्थितांच्या ज्ञानात भर घालण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या प्रशिक्षणामुळे उपस्थितांना आपली कृती योजना अधिक सक्षम करण्याबाबत आवश्यक माहिती मिळाली. कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी अधिकाऱ्यांनी अशा प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमांची नियमित आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. तसेच, प्रशिक्षणाबद्दल उपस्थितांचे मनोगत जाणून घेण्यासाठी प्रश्नावली स्वरूपात अभिप्राय (फिडबॅक) घेण्यात आले.
यावेळी नागपूर शहराचे पोलीस आयुक्त यांनी अशा प्रशिक्षणाची नेहमीच गरज असल्याचे मत व्यक्त केले आणि भविष्यातही अशा प्रकारचे प्रशिक्षण नियमितपणे आयोजित केले जातील असे आश्वासन दिले.
या महत्त्वाच्या प्रशिक्षणास नागपूर शहराचे पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), परिमंडळ क्र. १,२,३,४,५ चे पोलीस उप आयुक्त, वाहतूक शाखा, विशेष शाखा, पोलीस मुख्यालय येथील अधिकारी, तसेच सर्व सहायक पोलीस आयुक्त उपस्थित होते. याव्यतिरिक्त, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर महानगरपालिका, रुग्णवाहिका विभाग, अग्निशमन विभाग, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग, जलद प्रतिसाद पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक, श्वान पथक, दंगा नियंत्रण पथक, मोटार परिवहन विभाग, स्थानिक दहशतवाद विरोधी पथक युनिट, पोलीस ठाण्यातील ए.टी.सी चे अधिकारी व अंमलदार, विभागीय वन अधिकारी, नागपूर शहर यांचे सह नागपूर ग्रामीण पोलीस दलातील ६ पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक, ५ उप विभागीय अधिकारी, जिल्हा विशेष शाखा, सुरक्षा शाखा, ए.टी.बी/ए.टी.सी., क्यू.आर.टी., बी.डी.डी.एस./श्वान पथक चे अधिकारी व अंमलदार असे विविध विभागांचे प्रतिनिधी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








