spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

लिबर्टी टॉकीजला जोडणाऱ्या नवीन पुलासाठी महामेट्रोला मंजुरी; वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार

 

नागपूर, ३० – महामेट्रोला नागपूरमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी, विशेषतः कस्तुरचंद पार्क येथील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी एका नवीन उड्डाणपुलाला मंजुरी मिळाली आहे. हा नवीन पूल लिबर्टी टॉकीजजवळून एलआयसी चौक आणि कस्तुरचंद पार्कमार्गे संविधान चौकाला जोडला जाईल. याव्यतिरिक्त, मानस चौक ते इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स भुयारी मार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे.

कस्तुरचंद पार्ककडे चुकीच्या पद्धतीने उतरणाऱ्या सध्याच्या सदर उड्डाणपुलाच्या डिझाइनमधील त्रुटींवर आता तोडगा काढण्यात आला आहे. महामेट्रोने खात्री दिली आहे की, सदर उड्डाणपुलाला लिबर्टी टॉकीजजवळून एक नवीन पूल जोडला जाईल, जो एलआयसी चौक, कस्तुरचंद पार्कमार्गे संविधान चौकाशी जोडला जाईल.

सुमारे ३४ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या ६५० मीटर लांबीच्या पुलामुळे कामठी मार्गावरील वाहतूक सुरळीत होईल. सध्या कामठी मार्गावरून येणाऱ्या वाहनांना नासुप्र कार्यालयाच्या दिशेने जाऊन वळसा घेत पुन्हा कामठी मार्गाला लागावे लागते, ही अडचण नवीन पूल झाल्यानंतर दूर होणार आहे.

याव्यतिरिक्त, पूर्व नागपूर, उत्तर नागपूर आणि मध्य नागपूरला पश्चिम नागपूरशी जोडण्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या भुयारी मार्गासमोरील अडथळे आता दूर झाले आहेत. मानस चौक ते इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या ८७० मीटर लांबीच्या मार्गाचे काम १५ ऑगस्टनंतर सुरू होण्याची अपेक्षा आहे. वृक्षतोडीवर आक्षेप घेतल्याने हे काम यापूर्वी रखडले होते, परंतु महामेट्रोने १,५२४ झाडे लावल्यामुळे या कामाला गती मिळणार आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते १४ ऑक्टोबर रोजी झिरो माइल मेट्रो स्टेशनजवळील मानस चौक ते इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या प्रस्तावित भुयारी मार्गाचे भूमिपूजन करण्यात आले होते. या भुयारी मार्गासाठी ७९.६७ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, जीएसटी आणि इतर खर्च वगळता हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ६२.८४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

गर्दी कमी होणार:

या मार्गाला तीन प्रवेश आणि तीन निर्गमन राहणार आहेत. या प्रकल्पात ५.५ मीटर बाय ५.५ मीटरचे दोन बॉक्स आणि १० मीटर बाय ५.५ मीटरचा एक बॉक्स तयार करण्यात येईल. या मार्गामुळे मानस चौक ते लोखंडी पूल (लोहापूल) येथील गर्दी कमी होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल. हा भुयारी मार्ग झिरो माइलजवळ वर्धा रोडच्या दोन्ही बाजूने जाणार आहे. या मार्गामुळे भवन्स शाळा, बीएसएनएल कार्यालय, वनविभाग कार्यालय या परिसरातील गर्दीही कमी होईल.

@filephoto

Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.