spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खासगी शाळांच्या मनमानी शुल्काला चाप विभागीय शुल्क नियामक समितीची स्थापना

– पालकांसाठी हक्काचे व्यासपीठ

नागपूर :- खासगी अनुदानित- विनाअनुदानित शाळांच्या मनमानी फी वाढीला चाप लावण्यासाठी विभागीय शुल्क नियामक समितीची स्थापना करण्यात आली असून, त्यामुळे अवाजवी शुल्क वाढी विरोधात पालकांना हक्काचे व्यासपीठ उलब्ध झाले आहे. महाराष्ट्र् शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम २०११ मधील तरतुदीनुसार शासन अधिसूचना शालेय शिक्षण व क्रीडा विभाग \ २०११- प्रक्रं \ १३ \ एसएम – १३ अन्वये विभागीय शुल्क नियामक समितीची स्थापना करण्यात आली आहे. या अधिकृत यंत्रणेमुळे खासगी शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार असून, शैक्षणिक क्षेत्रात पारदर्शकता आणणे सुलभ होणार आहे.

विभागीय शुल्क नियामक समितीच्या अध्यक्षपदी ओ.पी. जयस्वाल (से.नि. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश) तसेच पदसिद्ध सदस्य सचिव म्हणून विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. माधुरी सावरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीला दिवाणी न्यायालयाचे विशेष अधिकार प्राप्त आहेत. एखाद्या शाळेसंबंधी तक्रार आल्यास शालेय प्रशासनाचे अधिकृत वित्तीय दस्तावेज आणि दप्तर तपासण्याचे व जप्त करण्याचे कायदेशीर अधिकार समितीला आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर दंडात्मक कारवाई करण्यासह अतिरिक्त किंवा ज्यादाचे शुल्क संबंधितांना परत करण्याचे आदेश देण्याचे अधिकार या समितीला आहेत. संबंधित शाळांची मान्यता रद्द करण्याची शिफारस संबंधित बोर्डाकडे (CBSE\ICSE\State Board) करण्याचे अधिकार सुद्धा समितीला आहेत.

समिती स्थापन करण्यामागील उद्देश

मनमानी फी वाढीवर अंकुश, डोनेशन, कॅपिटेशन फी किंवा विविध छुप्या शुल्कांच्या नावाखाली पालकांची होणारी फसवणूक थांबविणे, विद्यार्थ्यांना वाजवी दरात शिक्षण उपलब्ध करून देणे, पालकांच्या तक्रारींवर विभागीय पातळीवरच जलद गतीने सुनावणी होऊन न्याय मिळवून देणे, खासगी शाळांच्या फी रचनेत पारदर्शकता आणणे, असे ही समिती स्थापन करण्यामागील उद्देश आहेत.

तक्रार करण्याची पद्धत

नियमबाह्य फी वाढ असल्यास पालक किंवा पालक- शिक्षक संघ समितीकडे तक्रार करून शकतात. कोणत्याही पालकाने सहीनिशी तक्रार करणे आवश्यक आहे. एका साध्या कागदावर किंवा विहित नमुन्यात सविस्तर अर्ज लिहावा, त्यामध्ये शाळेचे नाव, पत्ता आणि मूळ समस्या (उदा. अवाजवी फी वाढ, नियमबाह्य वसुली) सप्ष्ट नमूद करावी. अर्जांसोबत शाळेने दिलेली फी पावती, फी वाढीचे परिपत्रक किंवा शाळेने मागणी केलेल्या अतिरिक्त शुल्काचे पुरावे जोडणे आवश्यक आहे. हा अर्ज समितीच्या कार्यालयात प्रत्यक्ष किंवा रजिस्टर पोस्टाने सादर करावा. या समितीचे कार्यालय शिक्षण उपसंचालक, नागपूर विभाग नागपूर या कार्यालयात दुसऱ्या माळ्यावर आहे. अधिक माहिती किंवा चौकशीसाठी dydpune@gmail.com किंवा dydnagpur@rediffmail.com या अधिकृत मेल आयडीवर संपर्क साधावा. अतिरिक्त फीवाढ किंवा अवाजवी शुल्कासंबंधी तक्रारी असल्यास पालक, विद्यार्थी, त्यांच्याशी संबंधित व्यक्ती किंवा संस्था यांनी समितीकडे संपर्क साधण्याचे आवाहन समितीच्या पदसिद्ध सचिव तसेच शिक्षण उपसंचालक डॉ. माधुरी सावरकर यांनी केले आहे.

Popular Articles