spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

दहिसर ट्रान्सपोर्ट हब प्रकल्पाच्या खोदकामाचा अहवाल तपासूनच पुढील कार्यवाही – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई :- दहिसर ट्रान्सपोर्ट हब हा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी बहुमाध्यम वाहतूक प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या खोदकामासंदर्भात प्राप्त झालेल्या अहवालाची सखोल तपासणी करूनच पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेतील लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले.

विधानसभेत सदस्य प्रकाश सुर्वे यांनी याबाबत लक्षवेधी उपस्थित केली होती.

राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले की, दहिसर येथील जुन्या जकात नाका परिसरात साकारण्यात येणारा हा पायलट प्रकल्प आहे. यामुळे बस, मेट्रो, टॅक्सी, खासगी वाहने आणि पादचारी यांच्यासाठी एकात्मिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणार आहे. वाहतूक कोंडी कमी करणे, आंतरराज्यीय बससाठी आधुनिक टर्मिनल उभारणे, विविध वाहतूक साधनांमध्ये सुलभ इंटरचेंजची सुविधा उपलब्ध करून देणे तसेच परिसराचा नियोजित व शाश्वत विकास करणे हा प्रकल्पाचा उद्देश आहे.

या प्रकल्पाच्या उत्खननादरम्यान कठीण बेसाल्ट खडक आढळल्याने संबंधित यंत्रणांची परवानगी घेऊन नियंत्रित विस्फोटकांचा वापर करण्यात आला. यावेळी बॅरिकेडिंग, धूळ नियंत्रणासाठी पाणी फवारणी, वाहतूक व्यवस्थापन आणि इतर आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर उत्खननाचे काम तात्पुरते स्थगित करण्यात आले. सदर खोदकामासंदर्भात आयआयटी मुंबई यांच्या निर्देशानुसार २० जून २०२६ रोजी आवश्यक चाचण्या करण्यात आल्या. या अहवालानुसार परिसरातील इमारतींना कोणताही धोका नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. या अहवालाची पूर्ण तपासणी करूनच प्रकल्पाची पुढील कार्यवाही करण्यात येईल असेही राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.