spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कर्तव्यनिष्ठ सेवेला मानाचा मुजरा; माधवराव पाटील डोंगरवार विद्यालयात सेवानिवृत्त मुख्याध्यापक वसंतराव गुढेवार व शिक्षक वासुदेव गेडाम यांना भावपूर्ण निरोप

– सत्कार समारंभ उत्साहात; सेवाभावी कार्याचा मान्यवरांकडून गौरव

पंकज परशुरामकर, इनसाइडर न्यूज टुडे प्रतिनिधी

नवेगावबांध :- शिक्षण क्षेत्रात अनेक वर्षे प्रामाणिकपणे व निष्ठेने सेवा बजावत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे माधवराव पाटील डोंगरवार विद्यालय, पवनीधाबे येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक वसंतराव गुढेवार तसेच सहाय्यक शिक्षक वासुदेव गेडाम यांचा विद्यालयात आयोजित भव्य सत्कार समारंभात शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. भावनिक वातावरणात त्यांना निरोप देताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

संस्थाध्यक्ष श्रीनारायण पाटील डोंगरवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव को. गो. रहिले, सहसचिव कुसन ईस्कापे, कोषाध्यक्ष लिलाताई डोंगरवार, पंचायत समिती सदस्य चंद्रकला ठवरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुनील रहिले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक पतिराम राऊत, प्राचार्य राणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी माता सरस्वती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांनी अभिवादन केले. त्यानंतर सेवानिवृत्त मुख्याध्यापक वसंतराव गुढेवार व त्यांच्या पत्नी शारदाताई गुढेवार यांचा शाल, श्रीफळ, साडी व भेटवस्तू देऊन सपत्नीक सन्मान करण्यात आला. तसेच सहाय्यक शिक्षक वासुदेव गेडाम यांचाही शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात गुढेवार व गेडाम यांनी विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची रुजवण करण्यासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव केला. त्यांच्या कार्यामुळे विद्यालयाची शैक्षणिक व सामाजिक ओळख अधिक भक्कम झाली असून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांचे जीवन घडविण्याचे कार्य केले, अशा शब्दांत त्यांच्या सेवेला सलाम करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभा हजारे यांनी केले. सूत्रसंचालन विश्वास मेश्राम यांनी प्रभावीपणे केले, तर पवन राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानले. वंदे मातरम् या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर आयोजित सामूहिक भोजनात सर्वांनी सहभागी होत सेवानिवृत्त शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

या प्रसंगी मुख्याध्यापक बोरकर, सहाय्यक शिक्षिका भूमिका पिल्लारे, सहाय्यक शिक्षक लोचन शेंडे, अनिल भोयर, दिपाली गजभिये, लिपिक सुरेश कोचे, प्रयोगशाळा परिचर जितेंद्र भोंडे, परिचर देवेंद्र बोहरे, प्रकाश मेश्राम, दिलीप चुटे, दिपिका चुटे यांच्यासह शिक्षकवृंद, पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण, स्नेहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला.

Popular Articles