कामठी :- कामठी तालुक्यात सुरू असलेल्या विशेष सघन मतदार यादी पुनरीक्षण (SIR) मोहिमेला किमान तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी घोरपड येथील प्रगतिशील तरुण शेतकरी मंगेश लांजेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सध्या खरीप हंगामातील शेतीची कामे जोरात सुरू असून ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक शेतीच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे कठीण ठरत आहे. या मोहिमेत नवीन मतदारांची नोंदणी, चुकीच्या नोंदी दुरुस्त करणे, मृत मतदारांची नावे वगळणे, स्थलांतरित मतदारांची नावे कमी करणे तसेच डुप्लिकेट नोंदी हटविणे अशी महत्त्वाची कामे समाविष्ट आहेत.
मंगेश लांजेवार यांनी सांगितले की, ही प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ असून बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) यांच्यावरही मोठा कामाचा ताण निर्माण झाला आहे. अनेक कुटुंबांतील सदस्य घराबाहेर असल्यामुळे माहिती संकलन आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करण्यात अडचणी येत आहेत.
शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील कामगार वर्ग दिवसभर शेतीच्या कामात व्यस्त असल्यामुळे त्यांना सर्वेक्षणासाठी वेळ देणे शक्य होत नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया अधिक प्रभावी, अचूक आणि सर्वसमावेशक होण्यासाठी एसआयआर मोहिमेला किमान तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा सकारात्मक निर्णय शासनाने घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या मागणीमुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक प्रतिक्रिया उमटत असून, शासन या मागणीवर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




