कामठी :- राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) संदर्भातील कथित पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप, अस्वस्थता आणि निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिजाऊ सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष तथा कामठी नगर परिषदेचे गटनेते काशिनाथ प्रधान यांनी केली आहे.
प्रसिद्धीपत्रकाद्वारे काशिनाथ प्रधान यांनी म्हटले आहे की, राज्यात पेपरफुटीच्या घटना आता अपवादात्मक राहिलेल्या नसून त्या वारंवार घडत आहेत. त्यामुळे परीक्षा व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत होत असून, प्रामाणिकपणे मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू आहे. हजारो विद्यार्थी दिवस-रात्र अभ्यास करून तसेच आर्थिक अडचणींवर मात करत स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. मात्र काही समाजकंटक आणि भ्रष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या कृत्यामुळे त्यांच्या परिश्रमावर एका क्षणात पाणी फिरते.
विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी परीक्षा सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने घेणे ही शासन व संबंधित यंत्रणांची मूलभूत जबाबदारी आहे. मात्र प्रत्येक वेळी पेपरफुटी किंवा गैरव्यवहाराच्या घटना समोर येत असल्याने शासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
टीईटी पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, यासाठी शासनाने प्रभावी आणि ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी काशिनाथ प्रधान यांनी केली आहे.




