– महापौर निता ठाकरे यांचे निर्देश
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेतर्फे शहराचा ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या महाल भागात उभारण्यात येत असलेल्या नवीन ‘श्रीमंत रघुजी राजे नगर भवन’ (टाऊन हॉल) च्या बांधकामासंदर्भात महापौर निता ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व मनपा आयुक्त डॉ. विपीन यांच्या प्रमुख उपस्थितीत मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृहात शनिवारी (ता.11) आढावा बैठक पार पडली. महापौर निता ठाकरे यांनी निश्र्चित कालावधीत कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच टाऊन हॉलच्या सर्व कामांबाबत कंत्राटदार, कन्सल्टंट, पीएमसी आणि अधिकारी यांनी एकमेकांशी उत्तम समन्वय साधून कामे पूर्ण करावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी उपमहापौर लिला हाथीबेडे, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, परिवहन समिती सभापती मंगला खेकरे, स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती अश्विनी जिचकार, महिला व बालकल्याण समिती सभापती सारिका नांदुरकर, जलप्रदाय समिती उपसभापती विजय (पिंटू) झलके, नगरसेवक सुधीर (बंडू) राऊत, नगरसेवक दिलीप दिवे, नगरसेविका सुषमा चौधरी, वैशाली उदापूरकर, अतिरिक्त आयुक्त अंकित, अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम, मुख्य अभियंता लीना उपाध्ये, उपायुक्त गणेश राठोड, कार्यकारी अभियंता अश्विनी येलचेटवार, राजेंद्र राठोड, प्रकल्प अभियंता राजीव गौतम, सहायक आयुक्त घनश्याम पंधरे, कंत्राटदार प्रफुल्ल देशमुख, पीएमसी प्रतिनिधी आणि मनपाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नागपूर महानगरपालिकद्वारे महाल येथे उभारण्यात येत असलेल्या नवीन श्रीमंत राजे रघूजीराव भोसले सभागृह (टाऊन हॉल) च्या नवीन इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. ६८०८.१३ चौरस मीटर भूखंडावर उभारण्यात आलेली ही नवीन टाऊन हॉल इमारत २ तळमजले अधिक ४ मजले अशी आहे.
बैठकीत कंत्राटदार प्रफुल्ल देशमुख यांनी बांधकामाबाबतची सविस्तर माहिती सादर केली. त्यानंतर टाऊन हॉलसाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर सविस्तर चर्चा झाली. महापौर निता ठाकरे यांनी बांधकामात येत असलेल्या अडचणी समजून घेतल्या व लवकरात लवकर बांधकामात झालेल्या सर्व बदलांचे ड्रॉईंग, वस्तूंच्या किमती, रेट ॲनालिसिस व इतर सर्व बाबींची माहिती प्रशासनाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या.
मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी कंत्राटदार, पीएमसी आणि सल्लागार यांना येत्या दोन महिन्यांत अधिक गतीने काम करण्याचे निर्देश दिले. तसेच ज्या ठिकाणी अतिरिक्त खर्च अपेक्षित असेल, त्याची त्वरित प्रशासकीय मान्यता घेऊन कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे यांनी टाऊन हॉल साठी लागणाऱ्या वाढीव खर्चाचा सविस्तर तपशील सादर करण्याच्या सूचना दिल्या. तर सत्तापक्ष नेते बाल्या बोरकर यांनी टाऊन हॉलच्या पुढील कामांची दैनंदिन माहिती प्रशासनाला देत राहण्याची सूचना केली. तसेच टाऊन हॉलचे कामे दर्जेदार आणि अधिक उत्तम करण्याच्या सूचना दिल्या.




