– धोकादायक वळणावर वारंवार अपघात; स्पीड ब्रेकरसह सुरक्षा उपाययोजनांची ग्रामस्थांची मागणी
खापा, वार्ताहर :- खापा पोलीस स्टेशन हद्दीतील कोथूळणा गावाजवळ शनिवारी (दि. ११ जुलै) सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास लसूण भरलेला ट्रक पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रकमधील दोघेजण गंभीर जखमी झाले असून, चालक काही काळ ट्रकच्या केबिनमध्ये अडकल्याने घटनास्थळी एकच खळबळ उडाली.
अपघातात उमेश बितोंडे (वय २७) व आशिष लाडे (वय २५), दोघेही रा. मुलताई, जि. बैतूल (मध्यप्रदेश) हे गंभीर जखमी झाले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच-४० सीटी-६६५५ क्रमांकाचा ट्रक मुलताई (मध्यप्रदेश) येथून लसूण भरून भुवनेश्वरकडे जात होता. कोथूळणा गावाजवळील धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.
घटनेची माहिती मिळताच खापा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे, पोलीस कर्मचारी श्याम सोळंकी, परवेज शेख तसेच सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने ट्रकमध्ये अडकलेल्या दोन्ही जखमींना बाहेर काढून सावनेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील प्राथमिक उपचारानंतर दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे रेफर करण्यात आले.
कोथूळणा गावाजवळील या धोकादायक वळणावर यापूर्वीही अनेक अपघात झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी तातडीने स्पीड ब्रेकर, इशारा फलक, रिफ्लेक्टर तसेच इतर आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांसह सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी केली आहे.
दरम्यान, या अपघाताची नोंद खापा पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.




