– पेपरफुटी थांबवा, शिक्षण वाचवा; विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करा – आंदोलक
– केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
कन्हान :- देशातील विविध प्रवेश परिक्षा, स्पर्धा परिक्षा व शासकीय भरती प्रक्रियेत वारंवार समोर येत असलेल्या कथित पेपरफुटी, अनियमितता आणि गैरव्यवहारांच्या निषेधार्थ कन्हान-पिपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शनिवारी दिवसभर शांततापूर्ण धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी “पेपरफुटी थांबवा, शिक्षण वाचवा, विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करा” अशा घोषणा देत केंद्र सरकारकडे कठोर कारवाईची मागणी केली. आंदो लनानंतर पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या माध्यमातुन केंद्र सरकारला निवेदन पाठविण्यात आले. निवेदनात शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरप्रकारांची निष्पक्ष चौकशी, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई आणि भविष्यात पेपरफुटी रोखण्यासाठी आधुनिक, सुरक्षित व पारदर्शक परिक्षा प्रणाली लागु करण्याची मागणी करण्यात आली.

आंदोलकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्ष, करिअर व मानसिक आरोग्यावर अशा कथित गैरप्रकारांचा गंभीर परिणाम होत असल्याचे सांगत शिक्षण व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याचे आवाहन केले. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजी नामा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या शिक्षण सुधारणा आंदोलनाला नैतिक पाठिंबा जाहीर करण्यात आला.
आंदोलनात अजय चव्हाण, चिराग वैद्य, रजनीश मेघ्राम, शाताराम जळते, मोतीराम रहाटे, हरिश तिडके, अशोक पाटील, प्रशांत मसार, ऋषभ बावनकर, नयन खोब्रागडे, रंजित पाटील, संदीप कभे, रोहित मानवटकर, रमेश चव्हाण, दिनेश ढोके, प्रविण सतदेवे, प्रदीप गायकवाड, महेंद्र चव्हाण, वहाब शेख, गणेश भालेकर, नरेश चिमणाकर, शैलेश माटे, रविंद्र दुपारे, संगीता वांढरे, अनिल ठाकरे, अभिजीत चांदुरकर, विनय यादव, दीपक तिवाडे आदींसह नागरिक, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








