– श्रीराम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या आरोपांच्या निष्पक्ष चौकशीची मागणी
कामठी :- अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या आरोपांच्या निषेधार्थ प्रा. अवंतिका रमेश लेकुरवाळे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी (दि. १२ जुलै) वडोदा येथे ‘रघुपती राघव राजा राम’ सत्याग्रह शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. या आंदोलनात ग्रामस्थ, महिला, युवक तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
सत्याग्रहाची सुरुवात वडोदा येथील पुरातन विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भजन-कीर्तनाने झाली. टाळ-मृदंगाच्या गजरात “रघुपती राघव राजा राम”सह विविध भक्तिगीतांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी देशात सद्भावना नांदावी तसेच श्रीराम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी प्रार्थना करण्यात आली.
यानंतर मंदिरातून दिंडी काढण्यात आली. ही दिंडी गावातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ पोहोचली. या वेळी विविध घोषणाबाजी करण्यात आली, तर लहान मुलांनी सादर केलेल्या भजनांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमानंतर वडोदा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. निवेदनात श्रीराम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या आरोपांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी व प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी व्हावी, अशी मागणी करण्यात आली.
या सत्याग्रहात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रश्मीताई बर्वे, जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अश्विन बैस, प्रा. अवंतिका रमेश लेकुरवाळे, तापेश्वर वैद्य, ज्ञानेश्वर वानखेडे, राजेंद्र लांडे, अनंत वाघ, मंगलमूर्ती थोटे, छाया हलमारे, पंकज ढोरे, अर्जुन राऊत, सुधाकर ठवकर, जोगेश्वरी कुठे, रमेश राऊत, निलेश कळंबे, विलास मोहोळ, शुद्धोधन मानवटकर, चंद्रकांत ढोंगे, पंकज कुथे, कोठीराम महल्ले, अल्पेश ठाकरे, महेंद्र मोटघरे, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष नानाभाऊ मंडलिक, पुरुषोत्तम वाघाये, सुनील धुसान, वामन बोबडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व भक्तगण सहभागी झाले.








