– संजय काटकर यांनी घेतला भंडारा जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा विस्तृत आढावा
हंसराज, भंडारा :- संजय काटकर (भा.प्र.से.), आयुक्त, सार्वजनिक आरोग्य विभाग तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांनी भंडारा जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य सेवेचा विस्तृत आढावा घेतला. या बैठकीत जिल्ह्यातील विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी, आरोग्य संस्थांची कार्यक्षमता, मातृ व बाल आरोग्य, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजार नियंत्रण, लसीकरण, आयुष्मान भारत, आरोग्य व आरोग्यवर्धिनी केंद्रे, मनुष्यबळाची उपलब्धता, औषधसाठा, पायाभूत सुविधा तसेच विविध योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी काटकर यांनी नागरिकांना दर्जेदार, सुलभ व वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देत सर्व आरोग्य अधिकाऱ्यांनी सेवाभिमुख दृष्टीकोनातून कार्य करण्याच्या सूचना दिल्या. शासनाच्या विविध आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून लाभ प्रत्येक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी क्षेत्रीय पातळीवर नियमित पाठपुरावा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
बैठकीत आरोग्य संस्थांमधील सेवा गुणवत्ता, रुग्ण समाधान, डिजिटल अहवाल प्रणाली, औषध उपलब्धता, उच्च जोखीम गरोदर माता व बालकांचे नियमित निरीक्षण, तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया, जलजन्य व संसर्गजन्य आजारांवर प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत विशेष सूचना करण्यात आल्या. तालुका आरोग्य अधिकारी व वैदकीय अधीक्षक यांना कामकाज करताना येणाऱ्या अडचणी बाबत विचारणा करून राज्यस्तरावरून त्याबाबत पाठपुरावा पाण्याबाबत अश्वस्थ केले.
बैठकीत डॉ शशिकांत शंभरकर उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर, डॉ. गोगुलवार, प्राचार्य, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नागपूर, डॉ. मनीष नंदनवार, सीपीएम (CPM), नागपूर, डॉ. सुजाता दुधगावकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, भंडारा, डॉ. नितीन कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी, भंडारा, डॉ. संदीप गजभिये, जिल्हा शल्यचिकित्सक, भंडारा, डॉ. अभिजित गोल्हार, जिल्हा आरोग्य अधिकारी, गोंदिया, डॉ. पुरुषोत्तम पटले, जिल्हा शल्यचिकित्सक, गोंदिया तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान व वैद्यकीय शिक्षण विभागातील अधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.




