spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जिद्दीसमोर आकाशही झुकले; चहाच्या टपरीवरील मुलगा बनला सरकारी कर्मचारी

नवेगाव बांध :- गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध येथील राकेशकुमार वासुदेव कोल्हे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महाराष्ट्र आरोग्य विभागात कक्ष सेवक पद मिळवून प्रेरणादायी यश संपादन केले आहे. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या राकेशकुमार यांच्या बालपणावर गरिबी आणि जबाबदाऱ्यांचे सावट होते. मोठ्या भावाच्या निधनानंतर वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांनी चहाच्या टपरीवर काम करण्यास सुरुवात केली.

टपरीवर येणाऱ्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवकांच्या चर्चा आणि यशोगाथांनी प्रेरित होऊन त्यांनी शिक्षणाचा ध्यास घेतला. वयाच्या २४व्या वर्षी चौथीत प्रवेश घेतल्याने समाजाकडून टोमणे सहन करावे लागले, तरी त्यांनी हार मानली नाही. दिवसा काम आणि रात्री अभ्यास करत त्यांनी २०१२ मध्ये दहावी, २०१४ मध्ये बारावी, २०१५ मध्ये टायपिंग परीक्षा आणि २०१७ मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पदवी पूर्ण केली

सरकारी नोकरीसाठी त्यांनी अनेक स्पर्धा परीक्षा दिल्या. काही ठिकाणी अपयश आले, मात्र त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा कायम ठेवली. अखेर २०२४ मध्ये महाराष्ट्र आरोग्य विभागामार्फत कक्ष सेवक पदावर त्यांची निवड झाली. सध्या ते अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालयात सेवा बजावत आहेत. सरकारी नोकरी मिळाल्यानंतरही ते स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू ठेवून आणखी मोठे ध्येय गाठण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत. त्यांचा संघर्षमय प्रवास आजच्या युवकांसाठी जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाचा प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.

Popular Articles