spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

प्रशासनाची संवेदनशीलता; मृत कर्मचाऱ्याच्या पत्नीस अवघ्या १० दिवसांत अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती

Ø जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

यवतमाळ :- रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या कृषी विभागातील कनिष्ठ लिपिक दुर्वास निस्ताने या कर्मचाऱ्याच्या पत्नीला अवघ्या १० दिवसांत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या आस्थापनेवर अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात आली. जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. ही कार्यवाही प्रशासनाच्या संवेदनशील आणि तत्पर कार्यपद्धतीचे उदाहरण ठरत आहे.

तालुका कृषी कार्यालय, बाभूळगाव येथे कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेले यवतमाळ येथील दुर्वास श्रीधर निस्ताने यांचा ३ जुलै रोजी यवतमाळ-धामणगाव मार्गावरील अपघातामुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.

या घटनेची दखल घेत जिल्हाधिकारी विकास मीना यांनी कृषी विभागाला अनुकंपा नियुक्तीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. महसूल, कृषी व इतर संबंधित विभागांनी समन्वय साधून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता जलद गतीने केली. परिणामी, अवघ्या १० दिवसांत मृत कर्मचाऱ्याच्या पत्नीला अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात आली.

नियुक्तीपत्र प्रदान करताना जिल्हाधिकारी विकास मीना यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले. अशा कठीण प्रसंगी शासन कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रशासनाच्या या तत्पर आणि संवेदनशील निर्णयाने शासकीय यंत्रणेच्या मानवतावादी दृष्टिकोनाचे हे एक प्रेरणादायी उदाहरण मानले जात आहे.

Popular Articles