– सफाई कर्मचाऱ्यांना पीपीई किट वाटप, पीएचसीतील आरोग्य सेवा व राजेंद्र हायस्कूलच्या जीर्ण इमारतीची पाहणी
खापा, वार्ताहर :- खापा शहरातील विकासकामांना अधिक गती देण्यासाठी आमदार डॉ. आशिष देशमुख आणि विधानपरिषद आमदार डॉ. राजीव पोतदार यांनी मंगळवारी (दि. १४ जुलै) नगर परिषद खापा येथे विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी शहरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण आणि सार्वजनिक सुविधांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
बैठकीत शहरात सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित विकासकामांची माहिती घेण्यात आली. रस्ते विकास, पाणीपुरवठा, स्वच्छता, हरित उपक्रम आणि नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी निगडित विविध कामांचा आढावा घेत विकासकामे निर्धारित वेळेत व उच्च दर्जाची पूर्ण करण्याचे निर्देश आमदार डॉ. आशिष देशमुख आणि आमदार डॉ. राजीव पोतदार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. विकासकामांमध्ये कोणताही विलंब होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
यावेळी नगर परिषद कार्यालयात ‘नमस्ते दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पीपीई (PPE) किटचे वाटप करण्यात आले. सफाई कर्मचारी हे शहराच्या आरोग्य व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ असून त्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले.
यानंतर आमदारांनी नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन केंद्राला भेट देऊन स्वच्छता व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली. कचरा विल्हेवाट, स्वच्छता व्यवस्थापन आणि उपलब्ध सुविधांचा आढावा घेत आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र (पीएचसी), खापा येथे भेट देऊन आरोग्य सेवा, उपलब्ध सुविधा आणि रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा आढावा घेण्यात आला. तसेच नगर परिषद द्वारा संचालित राजेंद्र हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या जीर्ण झालेल्या इमारतीची पाहणी करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक दुरुस्ती व पुढील कार्यवाहीबाबत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन राऊत, नगराध्यक्ष पीयूष बुरडे, उपाध्यक्ष सुनील पाहुणे, सर्व सभापती, नगरसेवक, नगरसेविका, सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच नगर परिषद अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या समन्वयातून खापा शहरातील विकासकामांना अधिक गती देत नागरिकांना दर्जेदार आणि प्रभावी नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.








