spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खापा मार्गावर गोवंश वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई; वाहनासह आठ जनावरे जप्त, दोन मृत

खापा, वार्ताहर :- खापा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कोच्ची फाटा येथे गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर खापा पोलिसांनी सोमवारी (दि. १३ जुलै) मध्यरात्री सुमारे १ वाजताच्या सुमारास धडक कारवाई करून वाहन ताब्यात घेतले. या कारवाईत वाहनातून आठ गोवंशीय जनावरे जप्त करण्यात आली असून त्यापैकी दोन जनावरे मृत अवस्थेत आढळून आली. उर्वरित सहा जनावरांची सुखरूप सुटका करून त्यांना राऊडगाव येथील गोशाळेत दाखल करण्यात आले. या कारवाईत अंधाराचा फायदा घेत वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला. त्याचा शोध खापा पोलीस घेत आहे.

खापा पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, मध्य प्रदेशातून गोवंशाची अवैध वाहतूक करणारे वाहन खापा मार्गे नागपूरच्या दिशेने येत आहे. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय एकनाथ राठोड, सहाय्यक फौजदार संदीप पाचपिल्ले, पोलीस हवालदार प्रकाश नांदुरकर व त्यांच्या पथकाने सापळा रचून वाहनाचा पाठलाग करत ते अडविले.

तपासणीदरम्यान एमएच-४६ एन-०५१० क्रमांकाच्या वाहनात मागील सीट काढून एकूण आठ गोवंशीय जनावरे अमानुष पद्धतीने कोंबून वाहतूक केली जात असल्याचे आढळले. त्यापैकी दोन जनावरे मृत अवस्थेत होती. उर्वरित सहा जनावरांना तातडीने बाहेर काढून पशुवैद्यकीय तपासणीनंतर राऊडगाव येथील गोशाळेत सुरक्षित हलविण्यात आले.

प्राथमिक तपासात संबंधित वाहन मध्यप्रदेशातील चांद चौऱाई येथून भिलापार टेकडी, बिचवा, खेकडानाला, बडेगाव व खापा मार्गे नागपूरच्या दिशेने जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून गोवंशाच्या अवैध वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

या प्रकरणी खापा पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले असून संबंधित चालक व इतर संबंधितांविरुद्ध लागू कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत चारचाकी वाहन आणि गोवंश जनावरे असा एकूण पाच लाख अंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गोवंशाची वाहतूक नेमक्या कोणत्या उद्देशाने केली जात होती, याचा सखोल तपास खापा पोलीस करीत आहेत.

Popular Articles