spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

देवलगाव रेल्वे फाटकामुळे वाहतूक कोंडी

– फ्लायओव्हर-अंडरपासची मागणी पुन्हा ऐरणीवर

– दिवसातून ३० ते ३५ वेळा फाटक बंद; हजारो नागरिक त्रस्त, रुग्णवाहिकांसह आपत्कालीन सेवांनाही अडथळा

 पंकज परशुरामकर, प्रतिनिधी नवेगावबांध :- गोंदिया–बल्लारशाह या मध्य रेल्वेच्या महत्त्वाच्या मार्गावरील देवलगाव (नवेगावबांध) रेल्वे फाटक परिसरातील नागरिकांसाठी गंभीर वाहतूक समस्येचे केंद्र बनले आहे. दिवसेंदिवस वाढणारी रेल्वे वाहतूक आणि त्यामुळे दिवसातून तब्बल ३० ते ३५ वेळा बंद होणारे रेल्वे फाटक यामुळे हजारो नागरिकांना वाहतूक कोंडी, वेळेचा अपव्यय आणि इंधनाच्या नासाडीचा सामना करावा लागत आहे. अनेक वर्षांपासून हा प्रश्न कायम असतानाही कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे.

देवलगाव रेल्वे स्थानकावर अनेक प्रवासी रेल्वेगाड्यांचा थांबा असून या मार्गावर मालगाड्यांचीही मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. परिणामी तीन रेल्वेमार्गांवरील सततच्या रेल्वे हालचालींमुळे फाटक वारंवार बंद करावे लागते. प्रत्येक वेळी सुमारे १० ते १५ मिनिटे वाहतूक ठप्प होत असल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात.

या फाटकाचा वापर नवेगावबांध, देवलगाव, अर्जुनी-मोरगाव, देवरी, आमगाव तसेच परिसरातील अनेक गावांतील नागरिक करतात. सकाळी कार्यालये, शाळा-महाविद्यालयांच्या वेळेत तसेच सायंकाळी गर्दीच्या वेळी फाटक बंद झाल्यास वाहतूक कोंडी अधिकच तीव्र होते. दुचाकी, चारचाकी, बस, मालवाहू वाहने आणि कृषीमाल वाहून नेणाऱ्या वाहनांच्या रांगा नियमितपणे लागत असल्याने नागरिकांना वेळेत गंतव्यस्थानी पोहोचणे कठीण होत आहे.

या समस्येचा सर्वाधिक फटका रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि इतर आपत्कालीन सेवांना बसत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गंभीर रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांना अनेकदा रेल्वे फाटक उघडण्याची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत मौल्यवान वेळ वाया जात असून रुग्णांच्या जीवितालाही धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर देवलगाव रेल्वे फाटकावर फ्लायओव्हर किंवा अंडरपास उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. विविध सामाजिक संस्था, व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी आणि स्थानिक नागरिकांनी अनेकदा रेल्वे प्रशासन व संबंधित विभागांकडे निवेदने सादर केली आहेत. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे.

परिसरातील अनेक गावांना जोडणारा हा प्रमुख मार्ग असल्याने भविष्यात रेल्वे वाहतूक वाढल्यास समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालय, मध्य रेल्वे प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी संयुक्तपणे तांत्रिक सर्वेक्षण करून फ्लायओव्हर किंवा अंडरपास उभारण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

ठळक मुद्दे

दिवसातून ३० ते ३५ वेळा रेल्वे फाटक बंद.

प्रत्येक वेळी १० ते १५ मिनिटे वाहतूक ठप्प.

दररोज हजारो नागरिकांना वाहतूक कोंडीचा फटका.

रुग्णवाहिका व इतर आपत्कालीन सेवांनाही विलंब.

इंधनाची नासाडी आणि नागरिकांच्या वेळेचा मोठा अपव्यय.

फ्लायओव्हर किंवा अंडरपासची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित.

नागरिकांची अपेक्षा

देवलगाव रेल्वे फाटकाचा प्रश्न हा आता केवळ वाहतूक व्यवस्थेपुरता मर्यादित राहिलेला नसून नागरिकांच्या सुरक्षिततेशी आणि परिसराच्या विकासाशी निगडित बनला आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

Popular Articles