मुंबई/लातूर प्रतिनिधी :- देशभरात गाजलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात केंद्रीय अन्वेषण विभाग च्या हाती धक्कादायक माहिती लागली आहे. तपासादरम्यान अटक आरोपी शिवराज मोटेगावकर यांच्या मोबाईलमधून केमिस्ट्री विषयाचे १३२ प्रश्न आणि प्रश्नपत्रिकेच्या ३६ प्रतिमा (इमेज) आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. यापैकी १३२ प्रश्नांपैकी १११ प्रश्न प्रत्यक्ष नीट परीक्षेत विचारण्यात आल्याचे तपासात समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सीबीआयच्या प्राथमिक तपासानुसार, मोटेगावकर यांनी मुख्य सूत्रधार म्हणून संशयित असलेल्या पी. व्ही. कुलकर्णी यांच्याकडून केमिस्ट्री विषयाचे प्रश्न मिळविण्यासाठी सुमारे ५ लाख रुपयांचा व्यवहार केल्याचा संशय आहे. या आर्थिक व्यवहारासंदर्भातील पुरावे आणि डिजिटल माहितीची पडताळणी तपास यंत्रणा करत आहे.
या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक करण्यात आला असून महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, लातूर आणि बीड येथे कारवाई करत अनेक संशयितांना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान डिजिटल उपकरणे, मोबाईल डेटा आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुराव्यांचे फॉरेन्सिक विश्लेषण सुरू आहे.
दरम्यान, सीबीआयने आरोपी शिवराज मोटेगावकर तसेच त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित बँक खाती आणि लॉकर्सची तपासणी सुरू केली आहे. या लॉकर्समध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे, डिजिटल पुरावे आणि कथित बेकायदेशीर मालमत्तेशी संबंधित दस्तऐवज मिळण्याची शक्यता तपासली जात आहे. पेपरफुटी रॅकेटमधील आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेण्यासाठी बँक व्यवहारांचे विश्लेषणही सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
शिवराज मोटेगावकर हे लातूरमधील कोचिंग क्षेत्रातील परिचित नाव मानले जाते. रेणापूर तालुक्यातील शेतकरी कुटुंबातून आलेल्या मोटेगावकर यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून एम.एस्सी. (केमिस्ट्री) शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीला घरगुती शिकवण्यांपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे मोठ्या कोचिंग संस्थेपर्यंत पोहोचला. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, त्यांच्या संस्थेची वार्षिक उलाढाल मोठ्या प्रमाणात असल्याचीही चौकशी सुरू आहे.
दरम्यान, हे संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ट असून सीबीआयचा तपास सुरू आहे. तपास पूर्ण होईपर्यंत संबंधित सर्व आरोपींवर झालेले आरोप न्यायालयात सिद्ध होणे बाकी आहे.




